पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यामध्ये सध्या 756 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी केवळ 36 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. इतर 720 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यांच्यामध्ये अतिसौम्य किंवा सौम्य स्वरूपाची लक्षणे पाहायला मिळत आहेत. मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात नोंदवले गेले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून, त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो. सध्या जिल्ह्यात 756 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र, कोरोनाबाधितांपैकी रुग्णालयात दाखल झालेल्यांचे प्रमाण जेमतेम 4 टक्के आहे. तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी ऑक्सिजनची गरज भासणार्यांचे प्रमाण दीड ते 2 टक्के इतकेच आहे. त्यामुळे काळजी करू नका, मात्र संसर्ग होऊ नये याची काळजी घ्या, असे नागरिकांना डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
शहरात 60 ते 70 कोरोनाबाधितांचे निदान होत आहे. त्यापैकी रुग्णालयात दाखल करावे लागणार्यांचे प्रमाण 3 ते 4 टक्के आहे, रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गरज भासणार्या रुग्णांची संख्या 1 ते दीड टक्के आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, बुधवारी जिल्ह्यात 1087 संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 98 रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले. म्हणजेच पॉझिटिव्हिटीचा दर 9 टक्के इतका आहे. बुधवारी जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.