पुणे : पोटनिवडणुकीत शिवसेनेला सहकार्य: शरद पवार यांची माहिती

पुणे : पोटनिवडणुकीत शिवसेनेला सहकार्य: शरद पवार यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला सहकार्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात स्पष्ट केले.

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. रोज अनेक घडामोडी घडत आहेत. खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? असा वाद निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी, आमची शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे म्हणत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.

दसरा मेळाव्याच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, एका पक्षाचे दोन भाग झाल्याने त्यातून एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेचे सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारले गेले आहे. अशा गोष्टी होतच असतात. या नवीन नाहीत. पण, त्याला एक मर्यादा ठेवणे गरजेचे आहे. ती मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. राज्यातील जबाबदार लोकांनी वातावरण सुधारण्यासाठी, ते दुरुस्त करण्यासाठी पावले टाकणे गरजेचे आहे. राज्याचे प्रमुख जरी पक्षाचे प्रमुख असले तरी ते राज्याचे प्रमुख आहेत, हे विसरता कामा नये, असेही पवार म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी सहभागी होणार आहे का? या प्रश्नवर पवार म्हणाले, या मेळाव्याशी राष्ट्रवादीचा काही संबंध नाही. एक कार्यक्रम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर एक कार्यक्रम शिंदे गटाचा आहे, त्यामुळे इतर पक्षांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. 'भारत जोडो' यात्रा हा काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यात इतर पक्षांनी सहभागी होण्याचा काहीच प्रश्न निर्माण होत नाही, असेही पवार म्हणाले. मराठा आरक्षण विषयावर राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी, समाजामध्ये कटुता येणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news