

Contractor creates scene over alcohol test
पुणे: दारूच्या नशेत कार चालवणार्याला पोलिसांनी थांबवले असता, त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची चाचणी करण्यास विरोध केला. आरडाओरडा करून चालकाने फाशी घेऊन जीवाचे बरेवाईट करून घेण्याची पोलिसांना धमकी दिली. दरम्यान, यावेळी पोलिसांना चालकाकडे रिव्हॉल्व्हर मिळून आले आहे.
याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अरुण निवृत्ती सूर्यवंशी (वय 50, रा. सेक्टर नं. 8, एरोली, नवी मुंबई), बाबुराव धर्माजी आंबेगावे (वय 55, रा. सोमराणा, ता. उदगीर, जि. लातूर) आणि लक्ष्मण प्रल्हाद पाटील (वय 39, रा. रिव्हर्व्य सोसायटी, कदमवाक वस्ती) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
याबाबत पोलिस कर्मचारी विजय राम सुतार यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुलगेट पोलिस चौकीच्या समोर 29 जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलगेट पोलिस चौकीसमोर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिस नाकाबंदी करून वाहने तपासत होते. त्यावेळी हा ठेकेदार सूर्यवंशी व त्याचे दोन साथीदार एका कारमधून आले. त्यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची कार बाजूला घेऊन ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाई करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी अरुण सूर्यवंशी याने या कारवाईला नकार देऊन सरकारी कामात अडथळा आणला. नाकाबंदी दरम्यान कायदेशीर कर्तव्य करताना पोलिसांबरोबर वाद घालून त्यांच्या अंगावर धावून आले. हातवारे करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.
पोलिसांना शिवीगाळ करून अरुण सूर्यवंशी याने दारूच्या नशेत मी स्वत:ला फाशी लावून घेऊन माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल, अशी धमकी दिली. तो स्वत:च्या कमरेला हात लावून काहीतरी शोधत असल्याचे व तो दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर मिळून आले. पोलिसांनी आर्म अॅक्टखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले की, आरोपी हा ठेकेदार असून त्याच्याकडे रिव्हॉल्व्हरचे लायसन्स आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला आहे.