पुणे: शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली फसवणूक करणार्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोघा नेपाळी आरोपींचा सहभाग आहे. ही टोळी फसवणुकीच्या गुन्ह्यातील रोकड ट्रान्सफर करण्यासाठी बँक खाती आणि सीमकार्ड उपलब्ध करून देत होते.
अनिकेत प्रशांत भाडळे ( वय. 27,रा. शिवाजीनगर गावठाण), नोरबु शर्पा (वय.28), अंगनुरी शर्पा (वय.21,रा. दोघे नेपाळ), सागर मच्छिंद्र गायकवाड (वय.26, रा. गणेशमळा, सिंहगडरोड), शिवतेज अशोकराव गुंजकर (वय.33, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Latest Pune News)
शहरातील एका व्यक्तीला एका कंपनीमार्फत ऑनलाईन शेअर ट्रेडींग केल्यास मोठा फायदा होईल असे प्रलोभन दाखवून, कंपनीचे एजंट दिव्या अग्रवाल आणि अशोक रेड्डी यांनी नियमित फोन कॉल आणि व्हॉटस्अद्वारे संपर्क साधला.
त्यांना एक लिंक पाठवून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर विविध कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने संबंधित व्यक्तीकडून 60 लाख 20 हजार रुपये उकळण्यात आले होते. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याबाबत सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत फसवणूक झालेल्या व्यक्तीने तक्रार दिली होती.
दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, फसवणूक झालेल्या रकमेपैकी 14 लाख 30 हजार रुपये ए.यू स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यावर वर्ग झाले होते. ते खाते आदियोगी स्क्रॅप अॅन्ड वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी शिवणे येथील असल्याचे पुढे आले. त्यानुसार या कपंनचीच डायरेक्टर भाडळे याला सायबर पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इतर चौघा आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी त्यांनादेखील अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून 10 मोबाईल फोन, 10 पेनड्रा़ईव्ह, बॅकेचे स्वाईप मशिन, चार लॅपटॉप, 53 बँकांचे डेबिट कार्ड, 174 विविध कंपन्याचे सिमकार्ड्स, विविध बँकाचे 55 चेकबुक, 39 कंपन्यांचे शिक्के, 27 बँकाचे मोकळे चेक, 04 हार्ड डिस्क, 27 क्युआरकोड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलिस आयुक्त मच्छिद्र खाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, संगिता देेवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संदेश कर्णे, कर्मचारी प्रविणसिंग राजपूत, राजुदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, नवनाथ कोंढे, सचिन शिंदे, अनिकेत भिंगारे यांच्या पथाकने केली.
असे चालवायचे रॅकेट!
आरोपी अनिकेत भाडळे याने एक बनावट कंपनी तयार केली होती. त्याने त्याच्या कंपनीचे करंट बँक खाते सायबर चोरट्यांना वापरण्यास दिले होते. त्या बदल्यात त्याला पैसे दिले जात होते. तर नेपाळी आरोपी नोरबु आणि अंगनुरी हे दोघे शहरातील हॉटलेमध्ये थांबवून इतर आरोपींमार्फत लोकांची बँक खाती वापरण्यास घेत होती. त्यांच्या मोबाईलचा ताबा एका डिव्हाईसमार्फत आपल्याकडे घेतल्यानंतर ते फसवणूक केलेले पैसे वर्ग करण्यासाठी त्या खात्याचा वापर करण्यास देत होती. सायबर पोलिसांना यामध्ये मोठी साखळी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.