Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खेड शिवापूर टोल नाका परिसरात नाकाबंदीदरम्यान एका इनोव्हा कारमधून पाच कोटींची रोकड पकडली होती. ही रोकड नेमकी कोणाची आणि कोठे चालली होती, याबाबत चर्चांना उधाण आले होते. अशातच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्याने आचारसंहिता जाहीर झाली आहे. त्यामुळे पाच कोटींवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या होत्या.
दरम्यान, आता ही रोकड आपली असल्याचा दावा एका बांधकाम ठेकेदाराने केला आहे. मात्र, त्याचे नाव उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. जप्त केलेली ही रोकड आयकर विभागाकडे जमा केली आहे.
रोकड पकडल्यानंतर पोलिसांनी ऑन कॅमेरा सरकारी पंचासमोर रोकड मोजून पंचनामा केला. पैसे तपासून पाहिले असता ते बनावट नसल्याचे समोर आले आहे. ज्या व्यक्तीकडे पैसे मिळाले त्यांनी सांगितले की, ते रोड बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी हे पैसे आपले असल्याचे म्हटले आहे. आम्ही संबंधित असलेल्या सर्व यंत्रणांना माहिती दिली आहे.
पैशावर दावा करणार्या ठेकेदाराने ती आपली असल्याचा जबाब आयकर विभागाला दिला आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड शिवापूर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्या वेळी अलिशान कारला अडवले असता त्यामध्ये मोठी रोकड असल्याचे दिसून आले.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित चालकासह चौघांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडील रक्कम एका बांधकाम ठेकेदाराची असल्याचे त्यांनी सांगितले. ही रक्कम आयकर विभागात जमा करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली. संबंधित कारचालक आणि इतर तिघांची चौकशी केली आहे. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाच्या तपासानंतर याप्रकरणी कारवाईची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
चौघांची चौकशी करून सोडले
आलिशान गाडीतून (एम 45 एझेड 2526 ) रक्कम सातारा-सांगलीच्या दिशेने नेण्यात येत होती. आरटीओकडील नोंदीनुसार ही गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे. मात्र, नलावडे यांनी ही गाडी बाळासाहेब आसबे यांना विकल्याचा दावा केला आहे. या गाडीमध्ये प्रवास करताना चालकासह चौघे होते. त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. चालकासह गाडीतून चौघे प्रवास करीत होते. सागर पाटील (सांगोला), रफीक नदाफ (सांगोला), बाळासाहेब आसबे (सांगोला), शशिकांत कोळी (चालक) असे वाहनातून प्रवास करत होते.