पुणे : मांजरीत रखडले बांधकाम प्रकल्प !

पुणे : मांजरीत रखडले बांधकाम प्रकल्प !

मांजरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांच्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या विकास आराखड्यास राज्य सरकारकडून अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही. परिणामी, या गावांमधील कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प सध्या रखडले आहेत. मांजरी परिसरात विविध प्रकल्प ठप्प पडल्याने बांधकाम व्यावसायिकांकडून नाराजी
व्यक्त होत आहे.

पीएमआरडीएने 23 गावांच्या हद्दीतील अनेक विकसकांना इमारती उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, ही गावे जून 2021 मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर नगररचना अधिनियम कायदा (युनिफाइड अ‍ॅक्ट) लागू झाल्यावर पीएमआरडीएकडून पुढील परवानग्या बंद केल्या आहेत. परिणामी, या गावांमधील कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प रखडले आहेत. या इमारतींमध्ये सदनिका मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यावर अवलंबून असलेल्या मजुरांचा रोजगारही बंद आहे.

बांधकाम व्यावसायिकांना याबाबत ग्राहकांना उत्तरे देताना त्रास सहन करावा लागत आहे. 11 गावांमध्ये विकास आराखडा झालेला नसतानाही महापालिकेकडून इमारत विकासासाठी सुधारित परवानगी दिली जात आहे. त्याचवेळी 23 गावांमध्ये प्रारूप विकास आराखडा होऊन त्यावर सूचना, हरकती घेऊन तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असतानाही या परवानग्या रखडल्या आहेत. महापालिकेच्या धर्तीवर पीएमआरडीएने देखील 'युनिफाइड अ‍ॅक्ट'नुसार या गावातील इमारत विकसकांना परवानगी द्यावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे.

मांजरी बुद्रुक येथे पीएमआरडीएने मंजूर केलेला आमचा बांधकाम प्रकल्प 23 गावांच्या विकास आराखड्याला सरकारची मंजुरी न मिळाल्याने रखडला आहे. सदनिका नोंद केलेल्या ग्राहकांच्या प्रश्नांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. 11 गावांप्रमाणे या गावांतही पूर्वी परवानगी दिलेल्या व सध्या रखडलेल्या प्रकल्पांना 'युनिफाइड अ‍ॅक्ट'नुसार सुधारित परवानगी मिळायला हवी.
                                                        -राहुल तुपे, बांधकाम व्यावसायिक

पीएमआरडीएने 2018 च्या आगोदरच्या बांधकाम प्रकल्पांना परवानग्या दिल्या आहेत. विकास आराखडा झाल्याशिवाय 'युनिफाइड अ‍ॅक्ट'नुसार परवानगी न देण्याचे निर्देश आहेत. सरकारकडून विकास आराखडा मंजूर होताच पुढील परवानगी दिली जाईल.
                                                                                        – सुनील मरळे,

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news