सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारणीस अखेर मुहूर्त

सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारणीस अखेर मुहूर्त

तळेगाव दाभाडे : राज्य शासनाकडून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सुमारे पाच वर्षांपासून रखडत चाललेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) उभारणीस मुहूर्त लाभला आहे. एसटीपी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत मंजूर एकूण तीनपैकी पहिल्या 20.45 (एमएलडी) दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या नियोजित केंद्राचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 29) करण्यात आले.

यशवंतनगर येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या जागेवर मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या केंद्राचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नगरअभियंता मल्लिकार्जून बनसोडे, मक्तेदार नितीन झाडे आणि कर्मचारी उपस्थित होते.

54 किमीच्या मलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण

सन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 56 हजारांवर आहे. आजमितीस दररोज सुमारे 11.50 एमएलडी सांडपाणी निर्माण होत आहे. त्यापैकी बायोडाव्हर्सिटी गार्डन येथे बायोटॅप पद्धतीने सुमारे 2 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शहराच्या लोकसंख्येच्या मानानुसार नगर परिषदेने 2045 पर्यंत प्रस्तावित लोकसंख्येचा विचार करून भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, तळेगाव दाभाडे शहराची सध्याची प्रवाही लोकसंख्या एक ते दीड लाखावर गेली असल्याबाबत विचारले असता मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले, की शहरात एकूण 86 किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्यांच्या कामापैकी 54 किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

एकूण 14.35 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्यावर प्रशासन भर देत आहे. स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत 10.2 एमएलडी क्षमतेचा एक एसटीपी मंजूर आहे. मंजूर प्रकल्पांचे सविस्तर अहवाल अंदाजपत्रकासह तयार करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

इंद्रायणी नदी उगमस्थानापासूनच प्रदूषण होत असल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्यानंतर त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा भाग म्हणून शहरातील संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदी प्रवाहास जोडण्यात येईल. नगर परिषदेतर्फे राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. येत्या जूनअखेर तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतून केवळ प्रक्रिया केलेले पाणी विसर्जित करण्याचे उद्दिष्ट आहे. इंद्रायणी नदीचा प्रवाह प्रदूषित होणार नाही, यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील.

– एन. के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news