पानशेत खोर्‍याचा होणार बाह्यजगाशी संपर्क ; स्वातंत्र्यानंतर प्रथमच राबविणार प्रधानमंत्री डिजीटल इंडिया योजना

पानशेत खोर्‍याचा होणार बाह्यजगाशी संपर्क ; स्वातंत्र्यानंतर प्रथमच राबविणार प्रधानमंत्री डिजीटल इंडिया योजना
Published on
Updated on

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील अतिमागास असलेल्या वेल्हे तालुक्यातील रायगड जिल्ह्यालगतच्या सह्याद्रीच्या डोंगररांगातील अतिदुर्गम पानशेत धरण खोर्‍यातील वाड्या-वस्त्या, खेड्या-पाड्यांचा मोबाईल फोनद्वारे बाह्यजगाशी आता संपर्क होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री डिजीटल इंडिया उपक्रमांच्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे हे शक्य होणार आहे. धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रायगड जिल्ह्यालगतच्या पोळे व शिरकोली येथे उच्च तंत्रज्ञानाचे दोन मोबाईल टॉवर उभारून पावसाळ्यापूर्वी या भागात मोबाईलचे नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे या भागातील डोंगरमाथ्यावरील वाड्यावस्त्यांसह गावांत मोबाईल फोनला रेंजही सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी मोबाईल टॉवरच्या उभारणी केली जात आहे. बारमाही रस्ते नसल्याने अनेक खेडी, वाड्यावस्त्यांचा दळणवळणाच्या साधनांअभावी पावसाळ्यात बाह्यजगाशी संपर्क तुटत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने गरोदर माता, बालकांचे तसेच सर्पदंश, नैसर्गिक आपत्तीत रहिवाशांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. मोबाईल फोनला रेंज नसल्याने या भागाचा बाह्यजगाशी संपर्क होत नाही. त्यामुळे पूर, वणवे अशा नैसर्गिक आपत्तीत तसेच गंभीर रुग्णांना वेळेवर मदत मिळत नाही तसेच निवडणुकांत मतदान केंद्राशी संपर्क ठेवण्यासाठी प्रशासनाला खडतर परिश्रम घ्यावे लागत आहे. आता मोबाईल आल्यास यावर मात करणे शक्य होणार आहे.

शिरकोली येथे टॅावर उभारणीस निगमचे अभियंता प्रतीक सोनवणे व सरपंच अमोल पडवळ यांच्या हस्ते प्रारंभ झाला. उपसरपंच माउली साळेकर, शिवाजी पडवळ, नामदेव पडवळ, दत्तात्रय भोसले, शंकर पडवळ, लक्ष्मण पडवळ, बाप्पु बोरगे आदी
उपस्थित होते.

या भागात शिवकालीन मंदिरे, देवराई, ऐतिहासिक स्थळे, घनदाट जंगले आहेत. त्यामुळे भाविकांसह पर्यटकांची संख्या वाढली आहे. हॉटेल व्यवसाय वाढला आहे. दुर्घटना, गैरप्रकार रोखण्यासाठी मोबाईल रेंजमुळे प्रशासनाला मदत होणार आहे.
                                                        – अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली

या योजनेंतर्गत वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम 16 ठिकाणी मोबाईल टॉवर उभे केले जाणार आहे. त्यामुळे बहुतांश भागांत मोबाईल रेंज उपलब्ध होणार आहे. पोळे व शिरकोली येथील मोबाईल टॉवर पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात येणार आहे.
                    – प्रतीक सोनवणे, अभियंता, भारत दूरसंचार निगम, पुणे विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news