

पुणे: रेल्वेच्या पुणे विभागाकडून चार नव्या रेल्वे मार्गिकांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे वेगाने सुरू असून, यातील काही टप्पे पूर्ण झाली, तर काही टप्पे नवीन वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. या चार मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यावर आष्टी, बीड, परळी, फलटण, कटफळ भागांतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकांचे जाळे विस्तारण्याची मोठी गरज सद्य:स्थितीत निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. देशभरात विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि नव्या मार्गिका टाकण्याची कामे सुरू आहेत. अशीच कामे रेल्वेच्या पुणे विभागात देखील सुरू आहेत.
या वेळी पुणे विभागात चार नव्या मार्गिकांची कामे सुरू असल्याची माहिती समोर आली. या नव्या मार्गिकांसाठी सुमारे 605 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मार्गिकांची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. काही मार्गिकांची कामे नुकतीच पूर्ण झाली असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
मार्गिकांसाठी निधीचे असे होईल वितरण
रेल्वेच्या पुणे विभाग प्रशासनाला या नव्या मार्गिकांसाठी सुमारे 605 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात आष्टी ते विघ्नवाडी, विघ्नवाडी ते बीड आणि बीड ते परळी या रेल्वे मार्गिकांसाठी 275 कोटींचा निधी देण्यात आला. तर फलटण ते कटफळ या नव्या मार्गिकेकासाठी 330 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे या मार्गिकांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे विभागातील नुकत्याच पूर्ण झालेल्या नव्या मार्गिका
अहिल्यानगर ते बीड -168.6 कि.मी.
आष्टी ते विघ्नवाडी - 67.11 कि.मी.
विघ्नवाडी ते बीड- 35.3 कि.मी.
या मार्गिकांची कामे प्रगतिपथावर
बीड ते परळी - 92.65 कि.मी. ही मार्गिका 2025-26 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
फलटण ते कटफळ - 38 कि.मी. ही मार्गिका मार्च 2027 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पुणे विभागात चार नव्या मार्गिकांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मार्गिकांमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. 2024-25-26-27 या कालावधीत या मार्गिका पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यातील काही टप्पे पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. लवकरच ती पूर्ण होतील.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग