

मंचर: गेल्या काळात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविक व पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढलेली असून, यातून वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता, प्लास्टिक कचर्याचे प्रमाण वाढणे, तसेच मंदिर परिसरात गर्दीने अस्वच्छता, पर्यावरणाचा ऱ्हास होणे या समस्या वाढल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य (विभाग 1) यांना भाविक व वाहनांच्या कमाल मर्यादा ठरवाव्यात, अशी मागणी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानाचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी केली आहे.
भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने ते धार्मिक व पर्यटनदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या परिसरातील 200 ते 300 किलोमीटरच्या आसपास असलेली शेती पावसावर अवलंबून असते. मात्र, भाविकांची वाढती गर्दी पाहता परिसरातील नैसर्गिक संतुलन धोक्यात आणत आहे. अभयारण्य म्हणून संरक्षित असल्याने, येथे रस्ते रुंदीकरण किंवा पार्किंगसारखी भौतिक सुविधा उभारणे शक्य नाही. (Latest Pune News)
परिणामी, कोंडीचा प्रसंग वारंवार घडत आहे व येणारे लोक व वाहन एकत्रितपणे अभयारण्यात प्रवेश करत असल्याने कचर्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भाविक आणि वाहनांची कमाल मर्यादा निश्चित करणे, गर्दी नियोजनासाठी प्रवेश नियंत्रण यंत्रणा उभारणे आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक निर्बंध व स्वच्छता मोहीम हे उपाय आखण्याची गरज कौदरे यांनी सूचविले आहे.
यामुळे गर्दीचा ताण कमी होईल, वाहतूक सुरळीत होईल, कचरा व्यवस्थापन सुधारेल व पर्यावरणाचा समतोल कायम राहील. स्थापत्य पर्यावरणाचा बचाव, धार्मिक आणि पर्यटन अनुभव यांचा समतोल साधण्यासाठी हे पाऊल निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास अध्यक्ष कौदरे यांनी व्यक्त केला आहे.