पुणे : अँटिलिया’बाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर-वाझे यांचेच

पुणे : अँटिलिया’बाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर-वाझे यांचेच

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अंबानींचे निवासस्थान असलेल्या 'अँटिलिया'बाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी मिळून केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

'अँटिलिया' प्रकरणात एका क्षुल्लक गुंडाच्या नावाने बनावट पासपोर्ट बनवण्यात आला होता. त्यावर पाकिस्तानचा एक्झिट-एंटर दाखवला गेला होता. वाझे आणि परमबीर सिंग यांनी तो तयार केला होता. मनसुख हिरेन शरण येण्यासाठी तयार झाला असता, तर त्याचा फेक एन्काऊंटर करण्याची योजना परमबीर सिंग आणि वाझेेची होती. वाझेच्या घरून राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) तो फेक पासपोर्ट मिळालेला आहे. 'एनआयए'ने ही माहिती उघड करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

भविष्यात 'ईडी'बाबत मोठा धमाका

सक्तवसुली संचालनालय (ईडी) बाबतदेखील भविष्यात मोठा धमाका करणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले. 'ईडी'च्या बाबतीत आमचा शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे. केंद्र सरकार म्हणेल तसा विभाग चालतोय. राणेंना आलेल्या 'ईडी'च्या नोटिसीचे काय झाले, हे कुणाला माहितीच नाही. 'ईडी'च्या माध्यमातून राणे भाजपमध्ये गेले. 'ईडी'च्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली. बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. 'ईडी'च्या यंत्रणेचा गैरवापर होतच आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

पश्चात्ताप विधानावरून नवाब
मलिक यांचा फडणवीसांना टोला

पहाटेच्या शपथविधीचा पश्चात्ताप होत असल्याचे विधान माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या विधानाचा राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. "चिडिया चुग गई खेत, अब पछताए होत क्या" असा त्यांनी चिमटा काढला आहे. तसेच 'आपल्याकडे अद्याप हायड्रोजन बॉम्ब शिल्लक असल्याचा' इशाराही मलिक यांनी दिला.

दरेकरांचा बुरखा फाडणार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कधीही मजुराचे काम न केलेलेे कोट्यधीश मजूर आहेत. मुंबई बँकेच्या माध्यमातून त्यांनी केलेला घोटाळा लवकरच बाहेर काढणार आहे. दरेकर यांनी न्यायालयातून 2 डिसेंबरपर्यंत मुदत घेतली आहे, त्यानंतर आपण दरेकरांचा बुरखा फाडणार असल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news