

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वैकुंठ स्मशामभूमीत 57 टक्के मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने परिसरातील वायू प्रदूषणात वाढ होत आहे. स्मशानभूमीवरील ताण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी स्मशानभूमी बंद ठेवण्यासोबतच विविध उपाय योजना केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 24 स्मशानभूमी उभारण्यात आल्या आहेत. या मागचा उद्देशच शहरातील विविध भागांतील नागरिकांना त्या-त्या भागांत अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, हा होता. मात्र, शहरातील एकूण मृतदेहांपैकी 57 टक्के मृतदेहांवर एकट्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात.
दरम्यान, वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात होणार्या वायू प्रदूषणामुळे व दुर्गंधीमुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ('नीरी') या शासकीय संस्थेकडून काही महिनांंपूर्वी वैकुंठ स्मशानभूमीची पाहणी करून काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने एक धोरण तयार केले आहे. यामध्ये 'वैकुंठ'तील अंत्यसंस्कारांची संख्या कमी करावी, सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावेत, रात्रीच्या वेळी स्मशानभूमी बंद ठेवावी, त्या-त्या भागातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावेत, यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे आदी उपाय योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या धोरणावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, लवकरच आयुक्तांची सही होऊन या धोरणाची अंमलबजावणी होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणार?
कोविड काळात कोविडच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहावर प्रशासनाकडूनच अंत्यसंस्कार केले जात होते. मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नव्हता. मात्र, कोविडचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने सर्व निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात द्यावा आणि नातेवाइकांनी संसर्गासंदर्भातील नियम पाळून आणि काळजी घेऊन अंत्यसंस्कार करावेत, असा विचार आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.