

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : पशुपक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने भारतात 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी चिमण्यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे आवर्जून नमूद करावे लागत आहे. माणसांच्या घराच्या छतावर राहून पिलांना जन्म देणारा पक्षी म्हणजे चिमणी. अलीकडील काळात शेतीसह जुनी दगडमातीची घरे नाहीशी झाली. सिमेंटची घरे तसेच बंगले उभे राहत असताना मोबाईलच्या आवश्यकतेसाठी टॉवर उभे राहिल्याने चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. पूर्वी दारात आलेल्या चिमण्यांसह लहान-लहान बालके खेळत असत; परंतु अलीकडील बदलत्या काळात चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्यामुळे चिमण्या नाहीशा होत आहेत.
जागतिक चिमणी दिन उन्हाळ्याच्या दिवसात येत असल्याने नागरिकांनी घराजवळ आजूबाजूला चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी ठेवून घरांच्या छतावर पक्ष्यांसाठी दाणे व पाणी ठेवण्याची आवश्यकता आहे. शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनोंद सर्पमित्र शेरखान शेख, पक्षिमित्र प्रवीणकुमार जगताप, गोरक्ष कर्हेकर, अमोल कुसाळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी अनेक ठिकाणी डोंगरांसह नद्यांच्या कडेला गरजेनुसार पक्षांच्या अन्नपाण्याची तसेच कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करण्यात येते, त्यामुळे या ठिकाणी अनेक चिमण्यांची कुटुंबे तयार झालेली असून पक्षीमित्रांनी लावलेल्या कृत्रिम घरट्यांतून अनेक पिलांचा जन्म झाल्याचे समाधान पक्षिमित्रांना आहे. यापुढील काळातही नागरिकांनी चिमण्यांसह पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे.
मूठभर धान्य होईल चिमण्यांसाठी मोठी मदत
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पक्ष्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणार असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव अमर गोडांबे यांनी सांगितले. जागतिक चिमणी दिनापासून अनेक पक्षिप्रेमी तसेच वन्यजीवांचे रक्षण करणार्या संघटना पुढाकार घेऊन चिमण्यांच्या दाणापाण्यासह कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करीत असतात. प्रत्येक नागरिकाने या पक्षमित्रांकडे मूठभर धान्याची मदत केली तर ती पक्ष्यांच्या मोठ्या हिताची असणार असल्याचे शेरखान शेख यांनी सांगितले.