पुण्यात काँग्रेस स्वबळावर लढणार; विरोधी आघाडीतील फाटाफूट सत्ताधार्‍यांना फायदेशीर ठरण्याची शक्यता

पुण्यात काँग्रेस स्वबळावर लढणार; विरोधी आघाडीतील फाटाफूट सत्ताधार्‍यांना फायदेशीर ठरण्याची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधी महाविकास आघाडी एकत्रित लढण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे. विरोधी आघाडीतील फाटाफूट सत्ताधारी भाजपला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे वारंवार जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता पुण्यातील सर्वच जागांवर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना व काँग्रेस यांच्यासह महाआघाडी करून भाजपला पराभूत करण्यासाठी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली होती. मात्र, काँग्रेस त्यात सहभागी होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना यांचीच आघाडी एकत्रितरीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. ही आघाडी, भाजप व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाल्यास, विरोधी मतांमध्ये मतविभागणी होईल. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस स्वबळावर लढल्यास, त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळेल. मात्र, त्यासाठी प्रत्येक प्रभागात सक्षम कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची आवश्यकता भासणार आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत दोन मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार पाच हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. काँग्रेसची शहरातील काही प्रभागात लक्षणीय ताकद आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करून आत्तापासूनच त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची आवश्यकता आहे.

काँग्रेसची पुणे शहर कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यानुसार, स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रभागांत पक्षसंघटनेची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

                                                            अरविंद शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील मोठा पक्ष या नात्याने अन्य पक्षांशी आघाडी करण्याची भूमिका घेतली आहे. जे पक्ष सोबत येतील, त्यांच्यासमवेत आघाडी करून निवडणूक लढवू. या वेळी पुण्यात भाजपचा पराभव निश्चित होईल. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुण्यात येईल.
                                                    प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news