महाराष्ट्रात यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार ;कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा विश्वास

महाराष्ट्रात यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार ;कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा विश्वास
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर महिलांसंबंधीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची 24 तासांत पूर्तता करण्यात आली. महाराष्ट्रातही येत्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचा आशावाद कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. बारामतीत अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कर्नाटकचे अर्बन डेव्हलपमेंट मंत्री बी. एस. सुरेश, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आर. व्ही. देशपांडे, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, दिगंबर दुर्गाडे, रमेश थोरात, उत्तमराव जानकर, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, प्रमोद काकडे, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, सचिन सातव आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सिद्धरामय्या यांना समाजरत्न पुरस्काराने पवार यांच्या हस्ते सन्मानित केले.

सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटक निवडणूकीपूर्वी काँग्रेसने महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापनेनंतर 24 तासांच्या आत हा निर्णय घेण्यात आला. महिला सबलीकरणासाठी आमचे सरकार तेथे प्रयत्नशील आहे. याशिवाय जाहीरनाम्यात कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा 2 हजार रुपये देण्याची आम्ही घोषणा केली होती. ती येत्या 15 ऑगस्टपासून लागू होईल. येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येईल. त्या वेळी कर्नाटकातील या योजना महाराष्ट्रात राबवाव्यात, अशी सूचना मी शरद पवार यांना करत असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले, राजसत्ता ही समाजासाठी वापरायची असते, जनतेला सन्मानाची वागणूक देण्यासाठी वापरायची असते हे अहिल्यादेवी होळकर यांनी कृतीतून दाखवून दिले. या महान विभूतीचे स्मरण करत असताना शेजारच्या राज्यातील धनगर समाजातून आलेले मुख्यमंत्री बारामतीत कार्यक्रमाला आले, याचा आनंद आहे. अजित पवार यांनी, बारामतीच्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे फक्त परिपत्रक या सरकारने काढले.

तरीही मोठा तीर मारल्याचा आव आणला जात आहे. नामकरणाचा सर्वाधिक आनंद बारामतीकरांना आहे. आमच्या मनामध्ये कोणतीही खोट नाही. पण हा निर्णय घेताना बारामतीकरांना विचारात घेऊन तो होणे अपेक्षित होते. सुळे म्हणाल्या, सिद्धरामय्या गेम चेंजर आहेत. त्यामुळे आता देशात बदल घडतो आहे.

प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी फसवणूक केल्याचे सांगितले. देशात चुकीच्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. सूत्रसंचालन कुमार देवकाते, ज्ञानदेव बुरुगंले यांनी केले. संग्राम देवकाते व सहकार्‍यांनी स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news