पुणे; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीला हजेरी लावली. भाजप प्रवेशासंदर्भात पाटील यांनी आपण अद्याप भाजप प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांची निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (दि.22) धायरी येथे बैठक घेतली. या बैठकीस भाजपच्या आमदारांसह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश नाही…
भाजप प्रवेशाबद्दल अंकिता पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी आपण अद्याप भाजप प्रवेश केलेला नाही. मात्र, प्रवेश झाला तर सर्वांना सांगेल. राजकारणात येऊन तीनच वर्षे झाली आहेत. अशा बैठकांमधून मी शिकत आहे. शिकण्यासाठीच या बैठकीला आल्याचे स्पष्ट केले. मी केवळ कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मी व्यासपीठावर बसले नव्हते. माझा अद्याप भाजपमध्ये प्रवेश झालेला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.