बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशात सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक ही विकास विरुद्ध विद्वेष अशी आहे. देशातील मतदार या निवडणुकीत विकासाला साथ देतील, असे मत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, विरोधकांकडून इडी, सीबीआयबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, परंतु या एजन्सीजकडील एकूण प्रकरणांत फक्त तीन टक्के प्रकरणे राजकारण्यांशी संबंधित आहेत. इडीने मागील दहा वर्षांत एक लाख कोटींची रक्कम जप्त केली आहे.
काँग्रेसवर त्यांनी टीका केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पाणउतारा केला, त्यांना पराभूत केले. आता घटना बदलली जाईल असा प्रचार केला जात आहे, तो साफ खोटा आहे. घटनेत बदल होऊ शकत नाही. मोदींच्या काळात सात वंदे भारत गाड्या सुरू झाल्या. विकासाचा वेग वाढला, असे त्या म्हणाल्या. बारामतीची लढत ही व्यक्तिगत नाही, असे स्पष्ट करून येथे आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस विरोधात होते, परंतु शिवसेना काँग्रेससोबत गेली. आता त्या पक्षाच्या काहींना सकाळी उठून शिवराळ भाषेत बोलण्याशिवाय काही काम राहिलेले नाही. त्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नसल्याचेही
त्या म्हणाल्या.
माजी मंत्री जयंत पाटील यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली होती, त्याबाबत त्या म्हणाल्या, जयंत पाटील अर्थमंत्री होते तेव्हा केंद्रात त्यांचे सरकार होते. तेव्हा त्यांच्या बाजूला मल्ल्या वगैरे मंडळी फिरत होती. त्यांच्या सरकारने त्याबद्दल काय केले हे आधी पाटील यांनी सांगावे.
यापूर्वी काहींच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात एकाच पक्षाला मतदान व्हायचे, दडपशाही केली जायची. लोकांचे पाणी बंद कर, कारखान्याला उशिरा ऊस ने, हॉटेलवर बुलडोझर चालव असे प्रकार घडले आहेत. शिंदे, फडणवीस व अजित पवार हे मात्र असे राजकारण करत नाहीत. ते विरोधकांनाही विकासासाठी निधी देतात, असे त्या म्हणाल्या. एकसारखी
दिसणारी चिन्हे कोणालाही दिलेली नाहीत. तुतारी व तुतारी फुंकणारा माणूस ही दोन्ही वेगवेगळी चिन्हे असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
हेही वाचा