

Pune News: काँग्रेसने पन्नास ते पंचावन्न वर्षे देशातील गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. गरिबांचे शोषण करून त्यांचा वापर केवळ मतपेटी म्हणून राजकारणासाठी केला, अशी टीका हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये विविध योजना राबवून देशातील गरिबांचे जीवनमान उंचाविण्याचे काम केले, असेही सैनी म्हणाले.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री सैनी बोलत होते. या वेळी प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, कुणाल टिळक उपस्थित होते. मुख्यमंत्री सैनी म्हणाले, काँग्रेसच्या काळात केवळ घोषणा केल्या जात होत्या. देशात मोदींचे सरकार आल्यानंतर घोषणा आणि विकास, हे दोन्ही होऊ लागले आहे.
मोदींनी गरिबांचा विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे व त्यांचा सन्मान करण्याचे काम केले. देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. काँग्रेसच्या 55 वर्षे काळात देश धीम्या गतीने विकासाकडे जात होता. त्यांच्या काळात भ्रष्टाचार मात्र वेगाने वाढत होता. काँग्रेसने 55 वर्षांत जेवढी गरिबांना घरे दिली, त्यापेक्षा दुप्पट घरे दहा वर्षांत मोदींनी दिली. काँग्रेसच्या काळात दहशतवादामुळे प्रत्येक व्यक्ती भयभीत होती.
काँग्रेसचे पंतप्रधान सांगतात, देशाच्या साधनसंपत्तीवर प्रथम अल्पसंख्याकांचा हक्क आहे. पण, मोदी म्हणतात, देशाच्या साधनसंपत्तीवर प्रथम गरिबांचा हक्क आहे. काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मतविभागणी करते आणि नंतर गरिबांचे शोषण करते, हा त्यांचा पूर्वेतिहास आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, हरियाणा निवडणुकीमध्ये आश्वासने दिली. पण, त्याची पूर्तता केली नाही. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने संविधानाबाबत खोटा प्रचार केला. आता मात्र काँग्रेसचा खोटारडेपणा जनतेच्या लक्षात आला आहे.
महाराष्ट्रातील युती सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी व्यक्त केला.