कात्रज संघाच्या संचालकांमधील धुसफूस कायम; 12 संचालकांची अनुपस्थिती

कात्रज संघाच्या संचालकांमधील धुसफूस कायम; 12 संचालकांची अनुपस्थिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची तथा कात्रज दूध डेअरीच्या संचालक मंडळाच्या एप्रिल महिन्यातील मासिक बैठकीस 16 पैकी 4 संचालकच उपस्थित राहिले. त्यामुळे मार्च महिन्याप्रमाणेच सलग दुसर्‍यांदा संचालक मंडळाची बैठक तहकूब करण्याची नामुष्की संघावर ओढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखालील कात्रज दूध संघाच्या संचालकांमधील धुसफूस मिटविण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना अपयश आल्याचे आता उघड बोलले जात आहे.

कात्रज दूध संघाच्या 28 मार्च रोजीच्या मासिक बैठकीस 16 पैकी 7 संचालकच उपस्थित राहिल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली होती. संघाचे पदाधिकारी बदलासाठी एक गट गेल्या दोन महिन्यांपासून सक्रिय झाला आहे. मात्र, पक्षनेतृत्वाकडून त्यास दाद दिली जात नसल्याने गुरुवारच्या (दि.28) बैठकीत संचालकांची उपस्थिती राहणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षकार्यालयात बोलविलेल्या बैठकीसही केवळ 4 संचालकच उपस्थित राहिले.

बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठीची धामधूम अंतिम टप्प्यात असल्यामुळे पुन्हा बैठक घेण्याबाबतचे सूतोवाच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपस्थितांशी चर्चा करताना केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तेवढेच संचालक कात्रजच्या मुख्यालयातील बैठकीस उपस्थित राहिले.

त्यामध्ये संघाचे चेअरमन केशरताई पवार, उपाध्यक्ष राहुल दिवेकर, ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के आणि दिलीप थोपटे यांचा समावेश आहे. संघाच्या विधी सल्लागाराने दिलेल्या सूचनेनुसार गुरुवारची बैठकही तहकूब करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत गारटकर यांच्यारशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

कात्रज दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटरला एक रुपया दूध दर फरक देण्याचा निर्णय झाला होता. त्यातील पहिल्या हप्त्याचे 4.13 कोटी रुपये दिवाळीपूर्वीच देण्यात आले. तर उर्वरित रक्कम 4 कोटी 13 लाख रुपये हे 20 एप्रिल रोजी जिल्ह्यातील 969 दूध उत्पादक संस्थांना देण्यात आले आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 50 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना मिळाला आहे.

                             – केशरताई पवार, चेअरमन, कात्रज दूध संघ,

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news