मंचर; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे; मात्र या पुढील काळात बैलगाडामालक, बैलगाडाशौकीन यांनी नियमांचे पालन करून बैलगाडा शर्यती भरवाव्यात, असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे. आढळराव पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. विधिमंडळाने केलेल्या कायद्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हा कायदा प्राण्यांचा छळ करणारा नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. गावगाड्यावरच्या अर्थकारणाला चालना देणार्या बैलगाडा शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणार्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत सर्व बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या.
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महत्त्वपूर्ण निकाल आहे. अनेक वर्षं बैलगाडा मालकांनी हा लढा दिला आहे. हे सर्वांचं यश आहे. ग्रामीण भागात बैलगाडा मालकांनी यापुढील काळात सर्व अटींचे पालन करून बैलगाडा शर्यती भरवाव्यात, असे देखील आढळराव पाटील म्हणाले.