

पुणे : गायक श्रीनिवास जोशी यांच्या गायकीची सुरेल झलक…. पौर्णिमा धुमाळे यांनी गायकीने केलेली सुरेल वातावरण निर्मिती…. पं. सुहास व्यास यांच्या सुरांची बरसात…. डॉ. ऐश्वर्या वेंकटरमण आणि सहकलाकारांच्या वादनाने रसिकांना दिलेली कर्नाटकी संगीताची स्वरानुभूती अन् कौशिकी चक्रवर्ती यांच्या मधुर स्वरांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सुरेल रंग भरले. तर रोणु मजुमदार यांच्या बासरी वादनालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. परंपरेप्रमाणे ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप करण्याची रीत आहे. पण, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या महोत्सवाला येऊ शकल्या नाहीत. सवाई गंधर्व यांच्या आवाजातील भैरवीतील ध्वनिमुद्रिका ऐकवून महोत्सवाचा समारोप झाला.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित या महोत्सवाचा शेवटचा दिवस रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगला. सुटीचा दिवस असल्याने महोत्सवाला मोठी गर्दी झाली. अखेरच्या दिवशी सुरुवातीला पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि शिष्य विराज जोशी सहगायनासाठी होते. श्रीनिवास यांनी शुद्ध सारंग रागात पं. शिवरामबुवा वझे यांच्याकडून ऐकलेली 'सुंदर कांचन' ही रचना आणि त्याला जोडून उस्ताद फैय्याज खाँ यांची बंदिश सादर केली. त्यांच्या गायनातून रसिकांना ग्वाल्हेर, आग्रा अशा घराण्यातील रचनांचा आनंद मिळाला.
त्यानंतर गायिका पौर्णिमा धुमाळे यांनी पहिल्यांदाच सवाईच्या स्वरमंचावर गायन सादर केले. 'बरवा' रागातील नोमतोममधून त्यांनी सुरेल वातावरण निर्मिती केली. त्यांनी मध्यलय एकतालातील बंदिश सविस्तर मांडून उस्ताद खादीम हुसेन खाँ ऊर्फ 'सजनपिया' रचित 'आयो है सावनमास' ही बंदिश सादर केली. खमाज रागातील 'ना मानूंगी' ही बंदिश की ठुमरी सादर करून त्यांनी विराम घेतला.
त्यानंतर ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे पुत्र आणि शिष्य पं. सुहास व्यास यांचे गायन झाले. त्यांनी राग 'धानी' मधील पं. सी. आर. व्यास यांची 'सब मिल गावे' ही बंदिश मांडली. त्याला जोडून 'ओ मनवा, तू मन जाने' ही रचनाही गायिली. त्यानंतर राग श्रीमधील झपतालातील 'अरज मोरी सुन ले' ही बंदिश, आणि 'सांज की बेल' या रचना सादर करून 'जोहार मायबाप' या भक्तिरचनेने त्यांनी समारोप केला. पं. रोणू मजुमदार यांनी समयाला अनुसरून जयजयवंती रागाचे रूप बासरीवादनातून उलगडत नेले. अतिशय शांतपणे आलापी करत त्यांनी रागविस्तार फुलवत नेला.
पं. रामदास पळसुले यांचा ढंगदार तबला साथीला येताच पं. रोणू यांची सुंदर लयकारी सुरू झाली. रसिकांच्या विनंतीला मान देऊन रोणू यांनी 'बाजे रे मुरलिया' या रचनेतील सौंदर्यस्थळे दाखवली. नंतर खेमटा तालात कजरी पेश करून त्यांनी महोत्सवाची सांगता केली.
प्रकृती बरी नसल्यामुळे डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन होऊ शकले नाही. त्यामुळे 2004 मधील पंडित भीमसेन जोशी यांच्या लाईव्ह मैफलीचे दुर्मीळ ध्वनिमुद्रण सांगतेवेळी ऐकवण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार सवाई गंधर्व यांच्या ध्वनिमुद्रिकेने या पाच दिवसांच्या स्वरसोहळ्याची सांगता झाली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
किरकोळ आगीची घटना
महोत्सवादरम्यान सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास कार्यक्रमस्थळी असणार्या इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन मंडपामधील कापडाने पेट घेतला होता. तिथेच उपस्थित असलेले नागरिक केदार केळकर यांनी अग्निरोधक उपकरणाचा (फायर एक्स्टिंग्युशर) वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी घटनास्थळी बंदोबस्तावर तैनात असलेली अग्निशमन दलाची गाडी आणि
जवान यांनी तातडीने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवत आग इतरत्र पसरू न दिल्याने मोठा धोका टळला. या घटनेमध्ये मंडपाच्या ठिकाणी असलेले कापड जळाले, इतर कुठेही आग पसरली नाही. सगळे व्यवस्थित झाल्यानंतर महोत्सव पुन्हा सुरू झाला.
क र्नाटक संगीतावर आधारित समूहवादनाने स्वरमंडपात वेगळाच माहोल निर्माण झाला. डॉ. ऐश्वर्या वेंकटरमण (व्हायोलिन), विनोद वेंकटरमण (मृदंगम), पॉल लिव्हिंगस्टोन (गिटार), रे बिलाय (ड्रमसेट), ए. व्ही. कृष्णन (घटम) या कलाकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या 'आत्मा' या समूहवादनाने स्वरमंडपात टाळ्यांचा कडकडाट सातत्याने सुरू राहिला. सुरुवातीला डॉ. ऐश्वर्या यांनी एकल वादनही सादर केले. प्रत्येक वादक कलाकारांची स्वतंत्रपणे एकल प्रस्तुतीदेखील रसिकांनी वाखाणली.
महोत्सवाची सांगतेची सायंकाळ प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली. कौशिकी यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले. कौशिकी यांनी समयोचित अशा 'पूरिया कल्याण' रागात 'होवन लगी सांज' हा पारंपरिक ख्याल झुमरा तालात सादर केला. पाठोपाठ तीन तालात 'सुनलीनो मोरी शाम' ही द्रुत बंदिश सादर केली. द्रुत लयीतील गायनात सरगमचे विविध पॅटर्न, वैविध्यपूर्ण लयकारी यामुळे त्यांनी वेगळा आनंद दिला. आदिदेव महादेव, ही यमन रागातील शिवस्वरूपाचे वर्णन करणारी रचना, पहाडी ठुमरी सादर करताना कौशिकी यांचे भावदर्शन उल्लेखनीय होते. 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे' या रचनेत कौशिकी यांनी अत्यंत नजाकतदार स्वराकृतींनी मांडणी केली.