

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रस्ता अपघातात जखमी झालेल्या रुग्णाच्या डाव्या हाताची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नोबल हॉस्पिटल्समध्ये यशस्वीरीत्या पार पडली. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सचिन आबणे आणि प्लास्टिक सर्जन डॉ. सुमीत सक्सेना यांचा समावेश असलेल्या डॉक्टरांच्या पथकाने रुग्णावर उपचार केले आणि सहा तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया केली. अपघातात डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे 22 वर्षीय अशोक पटेल (नाव बदलले आहे) यांची ब्रॅचियल धमनी खराब झाली होती आणि वरची रक्तवहिनी पूर्णपणे नष्ट झाल्याचे समोर आले. रुग्णाच्या हातामध्ये रक्त परिसंचरण पुन्हा सुरू करण्यासाठी प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली.
न्यूरो व्हॅस्क्युलर दुरुस्तीचा वापर करून तीन तासांच्या आत रुग्णाच्या धमनीचा प्रवाह पुनर्संचयित करण्यात आला. डॉ. सचिन आबणे आणि डॉ. सुमीत सक्सेना म्हणाले की, भारतात अपघातानंतरची पहिली 60 मिनिटे हा गोल्डन अवर मानला जातो. त्यामुळे दुखापतीची तीव्रता तपासणे आणि योग्य उपचार करणे अत्यावश्यक होते. तरुण रुग्णाचा हात आणि जीव वाचला, हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात डॉ. झेड. ए. खान यांच्या नेतृत्वाखाली तरुणाचे अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले. डॉ. संपत डुंबरे पाटील आणि डॉ. सचिन आबणे यांनी फेमर प्लेटिंग केले. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने ही कामगिरी केली.