

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : संत श्री सोपानदेव पालखी सोहळा 15 जूनला सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. बारामती तालुक्यात 17 जूनला सोहळा प्रवेश करणार आहे. मात्र निरा-बारामती मार्गावरील खड्डे, खचलेल्या साइडपट्ट्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वारकर्यांनी केली आहे. मार्गावरील काही पुलांची कामे चांगली झाली आहेत. मात्र, करंजेपूल येथील निरा डाव्या कालव्यावरील पुलाचे काम अर्धवट आहे. फरांदेनगर येथील ओढ्यावरील पुलाचे काम पालखी सोहळ्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पालखी सोहळ्यापूर्वी काही ठिकाणची कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील पुलांची कामे दर्जेदार केली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली तरीही रखडलेली कामे पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. करंजेपूल, सोरटेवाडी, कठीणपूल ते पेशवेवस्तीदरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. काटेरी झाडे तसेच धोकादायक फांद्या काढून पालखीपूर्वी होणारी देखभाल-दुरुस्ती व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा निरामार्गे बारामती तालुक्यात प्रवेश करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालखीवेळी मार्गाची दुरुस्ती केली जाते. साईडपट्ट्याचा धोका निर्माण झाला आहे. वेडीवाकडी वाढलेली झाडे- झुडपे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. जीवघेणे खड्डे आणि गतिरोधकांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बारामती आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणार्या या मार्गाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यावरील माहिती फलक, बस स्थानके, साईडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे.
रस्त्यानजीक काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी अतिक्रमणे हटविली होती. परंतु काही काळातच पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.