पिंपरी : ’सी-व्हिजिल’ वर नोंदवा आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

पिंपरी : ’सी-व्हिजिल’ वर नोंदवा आचारसंहिता भंगाच्या तक्रारी
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना 'सी-व्हिजिल' अ‍ॅपवर मतदारसंघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील चिंचवड व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना दोन्ही मतदारसंघातील आचारसंहिता उल्लंघन करणार्‍या अनुचित प्रकारांची तक्रार या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

यामध्ये अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. सी-व्हिजिल अ‍ॅपमुळे आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे सोईचे झाले आहे. निवडणूक प्रशासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवली आहे. या अ‍ॅपचा वापर मतदानाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत करता येईल. अ‍ॅपद्वारे तक्रारींचे छायाचित्र अथवा व्हिडीओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. वापरकर्त्यास आपली ओळख लपवून सुद्धा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे.

यामध्ये मोबाईल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारींच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत, मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई मात्र करण्यात येईल. तक्रार नोंदविल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात. पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या 59 तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news