पुणे : समाविष्ट गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेत महापालिकेच्या अधिकार्यांकडूनच 'रिंग' करण्यात आल्याचा आरोप टँकरधारक ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. या रिंगमध्ये सहभागी न झाल्याने पात्र असून, अपात्र करण्यात आल्याची तक्रार या ठेकेदाराने आयुक्तांकडे केली. गेल्या काही महिन्यांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तीन अधिकारी व कर्मचार्यांवर लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना कारवाई केली आहे.
असे असतानाच मांजरी बुद्रुक व परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या 30 लाखांच्या निविदेत अधिकार्यांकडूनच रिंग करण्याची तक्रार आल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ऑगस्ट महिन्यात मागविलेल्या या निविदेत एकूण पाच ठेकेदार सहभागी झाले होते. मात्र, त्यामधील तीन ठेकेदार विविध कारणास्तव अपात्र करण्यात आले आहेत, तर दोन ठेकेदारांना पात्र करण्यात आले आहे.
यामधील अपात्र करण्यात आलेल्या 'संतोष वॉटर टँकर' या ठेकेदाराने आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केलेल्या तक्रारीत संबंधित निविदा प्रक्रियेसाठी सर्व कागदपत्रे असतानाही कोणतेही कारण न देता अपात्र केल्याची तक्रार केली आहे. जे ठेकेदार रिंगमध्ये सहभागी झाले नाहीत, त्यांनाच जाणीवपूर्वक अपात्र करण्यात आले आहे. तर, पात्र करण्यात आलेल्या ठेकेदाराने खोटी कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संबंधित ठेकेदाराने आयुक्तांकडे केली आहे. याबाबत विभागप्रमुख अनिरुध्द पावसकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.