

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रांमधील कलगी-तुर्यांच्या कार्यक्रमांकडे आता श्रोत्यांनीदेखील पाठ फिरवली आहे. त्यामुळे पारंपरिक शाहिरी कला संकटात सापडली आहे. कोरोना महामारीनंतर गेल्या तीन वर्षांत कलगीतुर्यांच्या कार्यक्रमांना गर्दीच होत नसल्याने शाहीर मंडळींनी चिंता व्यक्त केली. यात्रा हंगामामध्ये कलगीतुर्यांचे सामने हे पूर्वीपासून होत आहेत. हरिविजय, पांडवप्रताप, रामायण, महाभारत, शिवपुराण, नवनाथ, मायाब—ह्म, कथा कल्पतरू, शिवशक्ती अशा विविध विषयांवर दोन शाहिरांमधील सवाल-जबाबांची जुगलबंदी होऊन श्रोत्यांचे मनोरंजन होत होते.
परंतु, आता गावोगावच्या यात्रांचे स्वरूप बदलले आहे. यात्रा कमिट्यांमध्ये तरुणवर्गाचा शिरकाव झाल्याने त्यांनी पारंपरिक कार्यक्रमांना फाटा दिला आहे. त्याचा कलगीतुर्यांवर परिणाम झाला आहे. याबाबत छत्रपती शिवराय कलगीतुरा संघटनेचे अध्यक्ष रामदास गुंड (काताळवेढेकर) म्हणाले, कोरोनापूर्वी कलगीतुर्यांच्या जंगी सामन्यांना श्रोत्यांचा मोठा वर्ग असायचा. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. श्रोत्यांनी कलगीतुर्याच्या सामन्यांकडे पाठ फिरवली. ग्रामस्थांकडूनदेखील कलगी तुर्यांच्या सामन्यांचे आयोजन करणेच बंद झाले. सद्य:स्थितीत कलगीतुर्यांच्या सामन्यांना दोन शाहिरी पार्ट्याच उपस्थित असतात. श्रोता वर्ग मात्र याकडे फिरकतदेखील नाही.
लोकाश्रयाची गरज
शाहिरी कला टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आहे. या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी गावागावात कलगीतुर्यांच्या सामन्यांचे आयोजन केले गेले पाहिजे. तरच ही कला टिकेल, असे पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे यांनी सांगितले.