

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कर्ज प्रकरणातील जामीनदार व्यक्तीला नोटीस बजावत त्याच्याकडून पैसे उकळून त्रास दिल्याने त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याने शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम, हवालदार सचिन रामचंद्र बरकडे आणि किरण भातलावंडे (रा. गवळी वस्ती, मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत, तर राजेंद्र ऊर्फ राजू राऊत (रा. नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत राऊत यांच्या 23 वर्षीय मुलीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी तरुणीचे वडील राजेंद्र राऊत यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. राऊत आणि आरोपी किरण मित्र आहेत.
किरण भातलावंडे याने त्याच्या चारचाकी गाडीवर कर्ज घेतले होते. त्यामध्ये राजेंद्र राऊत हे जामीनदार होते. किरण याने कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे फायनान्स कंपनीने कोर्टात धाव घेतली. त्यानुसार जामीनदाराच्या विरुद्ध कोर्टाने अजामीनपात्र वारंट काढले होते. राऊत यांना अटक करण्याची भीती दाखवून दोघा पोलिसांनी पैसे घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानुसार दोघा पोलिसांसह तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राऊत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली असून, त्यामध्ये किरण भातलवंडे याच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
– रमेश साठे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे.