पुणे : आरोग्यशास्त्र विभागात समाजाभिमुख संशोधन

पुणे : आरोग्यशास्त्र विभागात समाजाभिमुख संशोधन

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संशोधकांचे प्रशिक्षण, जगभरातल्या आरोग्य संस्थांशी समन्वय, आरोग्यविषयक संस्थांचे बळकटीकरण, आयुर्वेदातील संशोधन, योगशास्त्र अभ्यासक्रम या आणि अशा अनेक महत्त्वाच्या बाबी मागील तीन वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात विविध सामंजस्य कराराच्या माध्यमातून सुरू आहेत. विद्यापीठाने मागील तीन वर्षात दीडशेहून अधिक सामंजस्य करार केले. या माध्यमातून विद्यापीठ अनेक संस्थांशी जोडले गेले असून यातून समाजाभिमुख कामे आणि संशोधन करण्यात येत आहे.

विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभाग आणि आयुष मंत्रालय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार सध्या विद्यापीठात दोन एकत्रित संशोधन प्रकल्प सुरू आहेत. अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधीचा कोविड काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो की नाही यावर भारतभर संशोधन होत असून त्याचे एक संशोधन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक या प्रकल्पावर काम करत आहेत. एकूणच प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा उपयोग या विषयावर देखील विभागात संशोधन सुरू आहे, अशी माहिती विभागातील प्रा. डॉ. गिरीश टिल्लू यांनी दिली.

आयुष मंत्रालयासोबत जो करार झाला आहे त्या माध्यमातूनच कर्करोग आणि आमवात या आजारांवर आयुर्वेदिक औषधे विषयावर संशोधन सुरू आहे. त्यासोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीसोबत झालेल्या कराराच्या माध्यमातून निसर्गोपचार आणि जीवनपद्धती केंद्र विद्यापीठात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ. शशिकांत दूधगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, आरोग्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि संशोधन अभ्यासक्रम सुरू असून विद्यापीठातील या विविध उपक्रम आणि संशोधन प्रकल्पांसाठी आम्हाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळत असते, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. आरती नगरकर यांनी दिली.

विभागाने लता मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोबत जो करार केला त्या माध्यमातून ऑटीजम या विषयात अभ्यासक्रम ठरविण्यास मदत करणे, त्याला प्रमाणपत्राची जोड देणे आदी बाबी या विद्यापीठाने केल्या आहेत. त्यासोबतच कबीर बाग या संस्थेला योग अभ्यासक्रम तयार करून देण्याचे कामही विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यशात्र विभागाच्या प्रमुख डॉ. आरती नगरकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news