खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा
खेड-शिवापूर टोलनाक्यावर एम.एच. 12 आणि एम.एच. 14 या वाहनांना असलेली टोलमाफी 1 मार्चपासून बंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने तातडीची बैठक घेऊन आता 'चालते व्हा' आंदोलन करण्याची पुढची भूमिका घेतली असल्याचे खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
16 फेब्रुवारी 2019 मध्ये केलेल्या आंदोलनात हा टोलनाका हा 'पीएमआरडीए' हद्दीबाहेर हलवावा ही मुख्य मागणी होती. त्यावेळी खासदार, आमदार यांच्यासह कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र टोलनाका स्थलांतराचा विषय हा केंद्रीय स्तरावरील असल्याने तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा घेऊन सोडविला जाईल तोपर्यंत एम.एच. 12 आणि एम.एच. 14 या वाहनांना मोफत सोडण्यात येईल असा निर्णय झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) नागरिकांची दिशाभूल करीत आहे, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
पुणे-सातारा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, वाहतूक सुरळीत होत आहे, असे 'एनएचएआय' च्या अधिकार्यांनी आम्हाला सांगितले. मात्र, आमच्या मुख्य मागणीला बगल देऊन वेगळीच भूमिका त्यांनी घेतली आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. काम पूर्ण झाले म्हणून एम.एच. 12 आणि एम.एच. 14 च्या वाहनांना टोल आकारणी सुरू केली आहे, असे सांगत आहात, तर मग रस्त्याचे काम अपूर्ण असताना दहा वर्षे जो टोल घेऊन लूटमार केली आहे तो जनतेला परत करावा. आजपर्यंत या केलेल्या फसवणूकप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. आता यापुढे 'चालते व्हा' हे निर्वाणीचे आंदोलन सुरू करणार असल्याचे माउली दारवटकर यांनी सांगितले.
याप्रसंगी भोरचे सभापती लहूनाना शेलार, उपसभापती रोहन बाठे, मनसेचे जिल्हा संपर्क प्रमुख विलास बोरगे, वेल्हे राष्ट्रवादीचे शंकरनाना भुरूक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय वाडकर, बाळासाहेब गरुड, अमर बदगुडे, शुभम यादव, प्रवीण महाडिक, अशोक वाडकर, शहाजी अडसूळ, गोरख मानकर, सूर्यकांत भांडेपाटील, मलिक सय्यद, रामभाऊ मांढरे, सुरेश खोपडे आदी कृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.