

पुणे : नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. मात्र, आता एसीपींनी पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पत्र काढून गुन्हे कसे वाढले, याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आलेल्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करून घ्यायचे की त्यांना 'सरकारी काम अन् सहा महिने थांब', असे म्हणत ताटकळत ठेवायचे, असा सवाल त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. असे असले तरी पोलिस नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत असल्याचे ते चित्र आहे.
जर पोलिस ठाण्यांचा गुन्हेगारी आलेख (सीआर) वाढतो आहे, वरिष्ठ विचारतील म्हणून नागरिकांच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करून घ्यायचे थांबविले किंवा टाळाटाळ केली, तर ते शहराच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरू शकते. तक्रार घेऊन नागरिक पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना अनेकदा थांबवून ठेवले जाते. एवढेच नाही, तर हद्दीचा वाद निर्माण करून येथून तेथे अन् तेथून दुसरीकडे पाठविले जाते. त्यामुळे अन्याय, अत्याचार होऊनही ते तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
त्यातूनच गुन्हेगार निर्ढावतात. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दोन तासांत नागरिकांच्या तक्रारींची तखल घेऊन योग्य कार्यवाही करीत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेषतः महिला अत्याचारांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत.
आता एसीपींनी काढलेल्या खुलाशाच्या पत्रामुळे जर पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी तक्रार दाखल करून घेण्यास दिरंगाई केली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणे दूरच, तक्रार दाखल करण्यासाठीच झगडावे लागेल. त्यासाठी त्यांना पोलिस उपायुक्त, अपर पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, प्रसंगी पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयापर्यंत हेलपाटे मारावे लागतील. एखाद्या राजकीय पुढार्याची शिफारस आणावी लागेल. पोलिस ठाण्याचा गुन्हेगारी आलेख वाढतो आहे; म्हणजे त्या पोलिस ठाण्याचे अधिकारी काम करीत आहेत.
ते ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची दखल घेत असल्याचे मानले जाते. गुन्ह्यांची संख्या वाढते आहे म्हणून त्यांनी जर तक्रारींची दखल घेणे टाळले तर त्यातून अनेक अनुचित प्रकार घडू शकतात. प्रसंगी नागरिक न्यायालयाचे द्वार ठोठावतात. त्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी यापूर्वी शहरातील गुन्हेगारीचा आलेख किती वाढतो आहे, हे न पाहता नागरिकांच्या तक्रारींची किती लवकर दखल घेतली जाते, याला प्राधान्य दिले होते.