पिंपरी : रिंगरोड डीपीआरला आयुक्तांची सहमती

पिंपरी : रिंगरोड डीपीआरला आयुक्तांची सहमती
Published on
Updated on

मिलिंद कांबळे :

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर-हाय कॅपॅसिटी मास टॉन्झीस्ट रूट-रिंग रोड) डीपीआरला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सहमती दर्शविली आहे. प्रकल्पासाठी तब्बल 2 हजार 300 कोटींचा खर्च अपेक्षित असून, पालिकेची रितसर मान्यता घेऊन डीपीआर अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब शहरासाठी नव्या वर्षांतील गिफ्ट ठरू शकते.  रिंग रोडचा सुमारे 31.40 किलोमीटर अंतराचा सुधारित डीपीआरचे सादरीकरण महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या समोर सादरीकरण केले. या मार्गावर निओ मेट्रोचा धावणार आहे. मेट्रोपेक्षा हा खर्च कमी असून, या प्रकल्पावर एकूण 2 हजार 300 कोटींचा खर्च आहे. त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर मेट्रो व निओ मेट्रोने जोडले जाणार आहे.

डीपीआरला पालिकेने सर्वसाधारण सभेची मंजुरीनंतर तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल. राज्य व केंद्राच्या मंजुरीनंतर हा मार्ग मार्गस्थ होऊ शकतो. प्रकल्पाबाबत शहरवासीयांचा आशा पल्लवित झाल्या आहेत.

25 वर्षांपासून रिंगरोडची प्रतीक्षा

तब्बल 25 वर्षांपासून रखडलेला या रिंग रोड प्रकल्पासाठी सन 2019 मध्ये महामेट्रोकडून डीपीआर बनवून घेण्यात आला. मार्गात व नकाशात काही बदल व सुधारणा करून घेतल्यानंतर तो डीपीआर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापौर, उपमहापौर, पक्षनेते व गटनेते यांच्यासमोर सादर केला. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी तो डीपीआर 19 जानेवारी 2021 ला सादर केला. पुणे महापालिकेने डीपीआरमध्ये सुधारणा करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराने एकत्रित नियोजन करावे, अशी सूचना पवार यांनी केली. त्यानुसार पुणे पालिकेने डीपीआरमध्ये सुधारणा केल्या. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले. तसेच, आयुक्त पाटील यांचीही बदली झाल्याने ती फाईल धूळ खात आहे.

रिंगरोडचा मार्ग

तीस मीटर रूंदीचा हा 31.40 किलोमीटर अंतराचा एचसीएमआरटीचा एलिव्हेटेड (उन्नत) मार्ग आहे. नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, पीसीएमसी-वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, संचेती स्कूल, क्रांतीवर नगर, थेरगाव बिर्ला रूग्णालय, पवना नदी पार करून वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाइन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्थानक, निसर्ग दर्शन सोसायटी, गायरान, निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, स्पाइन रस्ता त्रिवेणीनगर, रूपीनगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनी (मर्झिडीझ बेंझ) समोरून इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी चौक, टेल्को रस्ता, सेंच्युरी एन्का, लांडेवाडी असा मार्ग आहे. हा मार्ग नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गास जोडला जाणार आहे.

देशात कोठेच नाही निओ मेट्रो

देशात कोठेचे निओ मेट्रो कार्यान्वित नाही. युरोपात निओ मेट्रो ट्रामा स्वरूपात रस्त्यावरून धावते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये ती एलिव्हेटेड करण्याचा उद्देश का आहे. त्यामुळे शहरात उड्डाणपुलाचे जाळ निर्माण असून शहर विद्रुप दिसेल, अशी शंका पालिकेच्या अधिकार्‍यांनी उपस्थित केली आहे. नाशिकशहरात निओ मेट्रोला शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्याचा डीपीआर अद्याप तयार नाही.

निवडणुकीनंतर हिरवा कंदील मिळण्याची शक्यता

रिंगरोड प्रकल्पासारखा महत्वाचा निर्णय आयुक्त प्रशासकीय राजवटीत घेण्यची शक्यता कमी आहे. त्या निर्णयाला राजकीय पाठबळ अत्यावश्यक आहे. महापालिका निवडणूक झाल्यानंतर सत्ताधार्‍यांकडून त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परिणामी, रिंगरोड डीपीआर मंजुरीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रिंगरोड डीपीआरला आयुक्तांकडून सहमती

महामेट्रोने पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोड व भोसरी ते चाकण या मार्गाचा डीपीआर नुकताच महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सादर केला. आयुक्तांना त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. रिंगरोडच्या डीपीआरला त्यांनी तत्वत: सहमती दिली आहे, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

प्राधिकरणाच्या अहवालानंतर अंतिम डीपीआर

इंद्रायणीनगर, भोसरी येथील डिस्ट्रीक्ट सेंटर ते चाकण या 16.11 किलोमीटर अंतराचा डीपीआरही पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर करण्यात आला आहे. पुणे-नाशिक महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डबल डेकर मार्गाचा डीपीआर तयार केला असून, तो अंतिम टप्प्यात आहे, असे प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मेट्रोला प्रतीक्षा करण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाच्या डीपीआरचा अभ्यास करून महामेट्रो आपल्या डीपीआरमध्ये सुधारणा करणार आहे. निओ मेट्रोच्या मार्गानुसार पालिका व महामेट्रो आपला हिस्सा उचलणार आहे. नागपूर शहरात महामार्ग व मेट्रो मार्ग असा एकत्रित असलेला डबरडेकर मार्गाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तो मार्ग महामेट्रोने बनविला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news