

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अडीच वर्षांपासून कलादालने आर्थिक नुकसानीत असल्यामुळे कलादालनांमधील प्रदर्शनांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. रसिकांकडून मिळणारा कमी प्रतिसाद, आर्थिक निधीची कमतरता, चित्रांच्या आणि छायाचित्रांच्या विक्रीला मिळणारा कमी प्रतिसाद, यामुळे आताच्या घडीला प्रदर्शनांची संख्या घटली असून, पुण्यात असलेल्या 10 ते 15 कलादालनांमध्ये फक्त आठवड्याला एक ते दोन प्रदर्शनेच होत आहेत. म्हणूनच आता छायाचित्रकार, चित्रकारांनी ऑनलाइन पद्धतीने छायाचित्र व चित्रांच्या विक्रीला प्राधान्य देणे सुरू केले आहे.
खासगी : दर्पण आर्ट गॅलरी, द मोनालिसा कलाग्राम, पी. एन. गाडगीळ अँड सन्स लि. आर्ट गॅलरी आदी.
राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, बालगंधर्व कलादालन, यशवंतराव चव्हाण कलादालन
आमच्या कलादालनात प्रदर्शने व्यवस्थित होत आहेत. काही अडचणी नाहीत. फक्त खासगी कलादालनचालकांना महिन्याचा खर्च भागविणेही कठीण होत असून, वीजबिलापासून ते कामगारांच्या मानधनापर्यंतचा खर्च करणेही अवघड झाले आहे. कलादालनांचे उत्पन्नही घटले आहे.
– गिरीश इनामदार, व्यवस्थापक, दर्पण आर्ट गॅलरी
कलादालनांमध्ये प्रदर्शन भरविल्यानंतर आता पूर्वीच्या तुलनेत चित्रांची विक्री होत नाही. खासगी कलादालनांचे शुल्क अवाच्या सव्वा आहेत. महापालिकेच्या कलादालनात शुल्क कमी असल्याने प्रदर्शनांच्या तारखांसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. प्रदर्शनांसाठी प्रायोजकही मिळत नाहीत. छायाचित्रकार-चित्रकारांना खासगी कलादालनात प्रदर्शन करणे परवडणारे नाही.
– घनश्याम देशमुख, व्यंग्यचित्रकार