

पुणे : पुढारी वृत्तसेवा
फार्मसी प्रवेशासाठी महाविद्यालयांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात 'पीसीआय' कडून मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर विद्यापीठांकडून संलग्नतेची प्रक्रिया करून मगच विद्यार्थ्यांना सीईटी सेलमार्फत फार्मसीच्या विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
यंदा ऑगस्ट महिना सुरू झाला, तरी पीसीआयकडून महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा दिवाळी उजाडणार असल्याची माहिती काही फार्मसी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दिली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बहुतांश सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, बी. फार्मसी व फार्म. डी. अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे फार्मसी अभ्यासक्रम प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
पीसीआयने अद्याप महाविद्यालयांना मान्यता दिलेली नाही. परिणामी, विद्यापीठांना संबंधित महाविद्यालयांना संलग्नता देणे शक्य झालेले नाही. या सर्व गोंधळामुळे फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रखडली असून, प्रवेश प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील व्यक्त केला आहे.
कोरोना प्रादुर्भावानंतर फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्याथ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बारावीनंतर फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
परंतु, इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, विधी, एमसीए, अॅग्रिकल्चर, प्लॅनिंग अँड डिझायनिंग, बी. एड. सह काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातील काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या एक ते दोन फेऱ्या झाल्या आहेत.
परंतु, फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्याप देखील सुरू झालेली नाही. विद्यार्थी व पालक प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, त्यांना तंत्रशिक्षण विभाग किंवा सीईटी सेलकडून याबाबतचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे.
नोव्हेंबर महिन्यात प्रवेश झाले, तरीही फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ९० दिवस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. वेळप्रसंगी सुटी न देता शनिवारी व रविवारी महाविद्यालये सुरू ठेवावे लागतील, तेव्हाच इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे फार्मसीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रियेला यंदा उशीर होत असल्यामुळे निम्मे प्रवेश तरी होतील का? याबाबत शंका आहे. गेल्या वर्षी देखील प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे काही जागा रिक्त राहिल्या होत्या. फार्मसी अभ्यासक्रमाशी संबंधित क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. परंतु, केवळ प्रवेश प्रक्रिया उशिरा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छा असूनही प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे फार्मसी कौन्सिलने याचा गांभीर्याने विचार करून तत्काळ संस्थांना मान्यता देणे गरजेचे आहे; अन्यथा याचा परीणाम विद्याथ्यर्थ्यांसह संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणार आहे. -
डॉ. व्ही. एन. जगताप, प्राचार्य, एमसीई सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी