पुणे : विजयस्तंभ कार्यक्रमाची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे : विजयस्तंभ कार्यक्रमाची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा, कार्यक्रमाची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्र-मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, की कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेची चांगली सुविधा राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. आरोग्य विभागाने मास्क वाटपाची सुविधा करावी. शौचालयांची नियमित स्वच्छता होईल आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाच्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांनी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे, असे त्यांनी सांगितले.

अभिवादन सोहळ्यासाठी 1 हजार 500 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून, 150 अतिरिक्त कर्मचारी स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात येणार आहे. 21 आरोग्य पथकात 240 कर्मचारी, 41 रुग्णवाहिका, बाईक अ‍ॅम्ब्युलन्स, 38 घंटागाडी, 10 अग्निशमन वाहने, 175 कचारकुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे अधिकारी करणार आज पाहणी

कोरेगाव भीमा येथे होणार्‍या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची तयारी जिल्हा प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. बैठका घेऊन सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांसह नियोजनातील सर्वच अधिकारी बुधवारी विजयस्तंभ परिसराला भेट देऊन तयारीची माहिती घेणार आहेत. पाण्याचे टँकर कुठे उभे राहणार, शौचालये किती ठिकाणी असणार, ओपीडीची ठिकाणे, हिरकणी कक्ष आदींची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, हवेली आणि शिरूर येथील गटविकास अधिकारी, जिल्हा  आरोग्य अधिकारी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच कनिष्ठ अधिकारी या पाहणीदरम्यान उपस्थित असणार आहेत. या वेळी कामाचा आढावा घेण्याबरोबरच शौचालये अस्वच्छ झाल्याने नागरिकांच्या तक्रारी असतात. त्या तक्रारी येऊ नये म्हणून प्रत्येक शौचालयांच्या ठिकाणांची जबाबदारीसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. तिथे त्यांचे फोन नंबर दिले जाणार असून, कर्मचार्‍यांची त्या ठिकाणच्या शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी असणार आहे.

महामार्गावर वाहतुकीत बदल

हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक 60 वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहेत.
शिक्रापूर अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरूर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोड मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, अहमदनगर रोड अशी जातील. मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (ट्रक/टेम्पो) ही वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहमदनगरकडे जातील.

महापालिकाही पुरविणार सुविधा

विजयस्तंभाला अभिवादन करण्यास येणार्‍या अनुयायांसाठी पुणे महापालिका सुविधा पुरविणार आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news