Sant Dnyaneshwar Maharaj: माऊलींच्या आळंदीत जागतिक किर्तीचे ज्ञानपीठ तयार करू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आळंदी: वारकरी संप्रदायाने जात पंथ धर्मविरहित समाज निर्माण केला असून हा जो भागवत विचार आहे. माऊलींचे जे शाश्वत व जागतिक तत्त्वज्ञान आहे. हे ज्ञानपीठाच्या माध्यमातून जगासमोर आणून या माध्यमातून जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आपण तयार करू त्यासाठी सुमारे सातशे एक कोटी रुपयांचा विकास आराखडा आपण राबवणार आहोत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीतील कार्यक्रमात दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्म महोत्सव निमित्त आळंदीत पार पडत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता शनिवार (दि.१०) रोजी शांतीब्रम्ह हभप.मारुती बाबा कुऱ्हेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या प्रसंगी मुख्यमंत्री फडवणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी नमो ज्ञानेश्वरा या स्मरणिका ग्रंथाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन,विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार,जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,पोलिस आयुक्त विनय चौबे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, विनेश म्हात्रे, आमदार महेश लांडगे,शंकर जगताप,बाबाजी काळे,उमा कापरे,बाळा भेगडे,देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ,सोहळा प्रमुख भावार्थ देखणे,विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप,चैतन्य महाराज कबीर,पुरुषोत्तम महाराज पाटील,ऍड.रोहिणी पवार,प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,आळंदीकर ग्रामस्थ माजी सभापती डी. डी.भोसले पाटील,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,भाजप नेते संजय घुंडरे व इतर मान्यवर,ग्रामस्थ,वारकरी,भाविक उपस्थित होते.(Latest Pune News)
इंद्रायणी नदी आम्हाला गंगेसारखी आहे. विकास आराखडा तयार केला होता त्याला मध्यंतरी अनेक स्पीडबेकर आले. आता पुन्हा हा विकास आराखडा सर्व प्रकारची मंजुरी घेऊन आम्ही केंद्राकडे निधीसाठी पाठवला आहे.
आम्हाला विश्वास आहे आम्ही हा आराखडा लवकरात लवकर केंद्र सरकारकडून मंजूर करून घेऊन. या विकास आराखड्याच नुकतच टेंडर काढले आहे.त्यात कन्सल्टंटची वर्कऑर्डर लवकरच आपण देऊ.काम लवकर सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे.पण अशी कामे पूर्ण होण्यासाठी कालावधी लागतो असेही फडणवीस म्हणाले.
कुऱ्हेकर बाबांची पद्म पुरस्कारसाठी शिफारस
वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांतीब्रम्ह मारुती बाबा कुऱ्हेकर यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पद्म पुरस्कार दिला जावा याकरिता राज्यसरकार केंद्राकडे शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

