

पुणे: तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार आठवड्यांत निवडणुका जाहीर करण्याचे आणि संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांची लोकशाही बळकट राहण्यासाठी निवडणुकांची गरज अधोरेखित करत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.ओबीसी आरक्षणाच्या प्रलंबित खटल्यांमुळे निवडणुका रखडल्याची दखल घेत, न्यायालयाने आता निवडणुकांसाठी स्पष्ट मार्ग दिला आहे. (Latest Pune News)
या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, उमेदवार व कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यंदा गुलाल आपलाच उडवायचा, या निर्धाराने इच्छुक नेते सज्ज झाले आहेत.
गेल्या आठवड्यात राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या पदाधिकार्यांनी पुण्यात बैठक घेऊन निवडणुका घेण्याची मागणी केली होती. संविधानातील 73व्या दुरुस्तीनुसार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, याच आधारावर ही मागणी करण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्या, जिल्हा परिषद व नगरपरिषदांमध्ये सत्तांतरासाठी सत्ताकांक्षी उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात जल्लोषाचे वातावरण आहे आणि निवडणुकीच्या तयारीस वेग आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षांची हालचाल
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी तयारीला गती दिली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी नुकतीच बैठक घेतली असून, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वर्षभर चाललेल्या सदस्य नोंदणी मोहिमेचा फायदा निवडणुकीत होईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसकडूनही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हा काँग्रेसने येत्या शुक्रवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आम्ही काँग्रेस म्हणून ताकदीनिशी लढणार आहोत.
भविष्यात अन्य पक्ष आमच्यासोबत येतील, त्यांच्यासोबतही लढाई करू, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, सत्ताधारी पक्षाला अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे निवडणुका लांबवल्या गेल्या. मात्र, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले. स्वबळावर लढायचे की महायुतीत, हे वरिष्ठ ठरवतील. आम्ही त्यांच्या आदेशानुसार काम करू, असे ते म्हणाले. सर्वच पक्षांनी निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली असून, कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.