कोंढवा: काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गनबोटे यांच्या कुटुंबीयांची शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. सरकार तुमच्या पाठीशी कायम उभे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी गनबोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्र्यांनी प्रथम कौस्तुभ गनबोटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कौस्तुभ यांची पत्नी संगीता, मुलगा कुणाल यांच्यासह परिवाराची चौकशी केली आणि त्यांना आधार दिला.
या वेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार योगेश टिळेकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, वृशाली कामठे, संगीता ठोसर यांच्यासह परिसरातील महिला आणि नातेवाईक उपस्थित होते. संगीता गनबोटे म्हणाल्या की,हल्ला झालेल्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था नव्हती. साहेब, आमच्या घरातला कर्ता माणूस गेला.
‘घरातला कर्ता गेलाय, मुलीला शासकीय सेवेत घ्या’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.
जगदाळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कर्वेनगर येथे आले होते. संतोष जगदाळे यांची आई माणिकबाई, पत्नी प्रगती, मुलगी आसावरी यांच्याशी या वेळी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून त्यांना आधार दिला. या वेळी संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी जगदाळे कुटुंबीयांनी केली.