new police stations announcement
पुणे: पोलिसांसमोरील बदलती आव्हाने, कायदा सुव्यवस्थेचे नवे प्रश्न, वाढते शहरीकरण लक्षात घेता पुणे शहर आयुक्तालयाअंतर्गत नव्याने पाच पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, येवलेवाडी आणि मांजरी ही नव्याने होणारी प्रस्तावित पोलिस ठाणी आहेत.
या पोलिस ठाण्यांसाठी एक हजार मनुष्यबळ देण्यात येणार असून, दोन नवीन पोलिस उपायुक्तांच्या पदाबाबतदेखील राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल. माहिती- तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षणासह विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्याची वाढ विचारात घेऊन पुढील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
त्यासाठी पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अशा यंत्रणांना एकत्र येऊन काम करावे लागणार असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहरात उभारण्यात येणार्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.8) फडणवीस यांच्याहस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहर आणि जिल्ह्यातील आमदार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुण्याचे पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा आदी या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुणे शहराचा विस्तार होत असताना पोलिस दलातही आधुनिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यापूर्वी राज्य शासनाने पुण्यात सात पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली होती. ही पोलिस ठाणी कार्यान्वित झाली. एकाच वेळी सात पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ होती.
पुणे म्हटलं की, आम्ही काही नाही म्हणत नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता पुन्हा पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. लोहगाव, नर्हे, लक्ष्मीनगर (येरवडा), मांजरी (हडपसर), येवलेवाडी (कोंढवा) येथील पाच पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाईल. शहरात आणखी दोन पोलिस उपायुक्त देण्याची मागणी केली आहे. सीसीटीव्ही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन दहा वर्षांपूर्वी केले होते.
या प्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नियंत्रणकक्ष जोडणे आवश्यक होते. या कक्षासह देशातील सर्वाधिक आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली पुण्यात सुरू केली आहे. त्यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणासोबत गुन्हे आणि परिस्थितीचे विश्लेषण अत्याधुनिक ’एआय’ कॅमेर्यांद्वारे होणार आहे. पोलिस दलासमोरील आव्हाने, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन साठ वर्षांनंतर पोलिस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली उभारण्यात येणार आहे. या प्रणालीशी ट्रॅफिक सिग्नल जोडण्यात येतील. याद्वारे शहरातील वाहतुकीची गती वाढविण्यास आणि पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळविण्यास मदत होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सहाय्याने वाहतूक व्यवस्थेवर
नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाने गेल्या दीड वर्षात पुणे पोलिस दलास एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्या माध्यमातून सीसीटीव्ही यंत्रणा, बोपदेव घाटासह टेकड्यांवर वाढवलेली सुरक्षा, गस्त घालण्यासाठी आधुनिक व्हॅन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली आहे. बोपदेव घाटासह शहरातील निर्जन ठिकाणे, टेकड्यांवरील सुरक्षेसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुणे पोलिस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून महत्त्वाची भूमिका पार पाडली जात आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, जिल्हा वार्षिक योजनेला मंजूर केलेल्या 22 हजार कोटी रुपयांतील पाच टक्के रक्कम ही पोलिस दलासाठी राखीव ठेवली आहे. आतापर्यंत पुणे जिल्हा नियोजन समितीने 40 कोटी रुपये पोलिस दलाला दिले आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यात दाखल होणार्या प्रत्येकाच्या तक्रारीचे निराकरण केले पाहिजे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री