

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील बेट भागात गेले दोन दिवसांपासून ढगाळ व धूसर वातावरण असून रब्बी हंगामातील पिकांवर या वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यानंतरदेखील अस्मानी संकट शेतकर्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीने खरिपातील पिके वाया गेली गेल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या नियोजनातून शेतकरी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना गेले दोन दिवसांपासून आकाशात दाट ढगाळ व धूसर वातावरण तयार होत आहे. सकाळी धुके आणि त्यानंतर आकाशात दिवसभर धूसर वातावरण पाहायला मिळत आहे.
बेटभागात रब्बी हंगामातील कांदा पीक लागवडीसाठी शेतकर्यांच्या शेतात असलेली कांदा रोपे खराब हवामानाने पिवळी पडण्याची शक्यता आहे. तसेच रब्बी हंगामातील कांदा, तरकारी तसेच जनावरांचे चारा पिकांवर विविध प्रकारच्या किडी, मावा, तुडतुडे या रस सोशक किडींचा पिकांवर प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकर्यांना पिकावर महागडी औषध फवारणी करावी लागणार आहे.
पावसाने खरिपातील कांदा पिकांचे नियोजन कोलमडल्यानंतर रब्बी हंगामातील कांदा पिकांच्या नियोजनासाठी शेतकर्यांनी कांदा रोपे तयार केली आहेत. परंतु सध्याच्या या खराब हवामानाचा या रोपांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. परिणामी रब्बी हंगामातील कांदा लागवडीवर परिणाम होणार आहे.