लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : हिमालय लडाखमध्ये सहा हजार मीटरपेक्षा जास्त उंची असलेली तब्बल पाच शिखरे केवळ सात दिवसांत सर करून दाखवण्याची अवघड कामगिरी लोणावळ्यातील तरुण गिर्यारोहक नासवान जिमी इंजिनिअर आणि सिद्धेश मिश्रा यांनी पूर्ण केली आहे.
शिखराच्या माथ्यावर फडकवला तिरंगा
भारतातील लडाख येथील प्रसिद्ध त्सोमोरीरी लेक येथून नासवान जिमी इंजिनिअर आणि सिद्धेश मिश्रा यांनी आपली हिमालयातील आपली साहसी मोहीम सुरू केली, त्यांनी या मोहिमेस प्रोजेक्ट 567 असे नाव दिले. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सिद्धेश मिश्रा आणि नासवान इंजिनिअर यांनी 'कोर्झक कांगरी (6140 मीटर) शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यापाठोपाठ यालुंग नॉन्ग साउथ (6080 मीटर), यालुंग नॉन्ग (6070 मीटर), मॅटोक कांगरी 3 (6120 मीटर) या निर्जन पर्वतांच्या शिखरांवर अल्पाईन शैली पद्धतीने चढाई करीत यश मिळवले.
तर मोहिमेच्या शेवटच्या टप्यात 6250 मीटर उंचीचे माऊंट मेंटोक कांगरी 2 हे शिखर सर केले.
ऑक्सिजनचे कमी प्रमाण, निसटते खडक व गोठविणारी मोहिमेतून दिशा देईल. थंडी यांचा सामना करत सिद्धेश व नासवान यांनी शिखराच्या माथ्यावर यशस्वीपणे पाऊल ठेवत त्यावर तिरंगा फडकवला. यानंतर राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला सलामी दिली. सलग सात दिवसांत हिमालयातील पाच शिखरे सर करून या दोघांनी देशाचे नाव उंचावले. त्यामुळे लोणावळ्यातील नागरिकांकडून त्यांचे कौतूक होत आहे.