बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका; वाल्हे परिसरातील शेतकरी हवालदिल

बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका; वाल्हे परिसरातील शेतकरी हवालदिल

वाल्हे (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : यावर्षी खरीप हंगामातील पिकांना पावसाने झोडपले होते, तर आता रब्बी हंगामातील पिकांना वातावरणाने रडवले, अशी स्थिती वाल्हे परिसरातील शेतकरीवर्गाची झाली आहे. या वाढत्या थंडीचा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. मागील आठवड्यात वातावरणातील बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्या ढगाळ वातावरणाने शेतातील अनेक पिकांवर विपरीत परिणाम होऊन किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. तसेच मागील चार- पाच दिवसांपासून थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, या वाढत्या थंडीमुळे शेतकरीवर्गामध्ये "थोडी खुशी, थोडा गम" अशी अवस्था निर्माण झाली आहे.

वाढत्या थंडीचा मोठा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला असून, यामध्ये अंजीर उत्पादक शेतकरी वर्गाला जास्त आर्थिक फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे अंजीर पिकावर करपा, तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे फळ पिवळे पडून गळू लागले आहे. लहरी हवामानामुळे व वाढत्या थंडीने हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने फळे उकलू लागली आहेत. अंजीर जागेवर उकलू लागल्यामुळे उत्पादक शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत.

दरम्यान, रब्बी पिकांची पेरणी केल्यापासून शेतकरीवर्ग थंडीची वाट पहात होता. थंडीअभावी शेतक-यांची रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका, कांदा, हरभरा ही पिके धोक्यात सापडली होती. मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, सद्यःस्थितीत ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना थंडी पोषक ठरत आहे. त्यामुळे अंजीर उत्पादक संकटात तर अन्य शेतकरी समाधानी दिसत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news