

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या उपक्रमांतर्गत एसटीच्या पुणे विभागात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभाग घेऊन आपले आगार, बस स्थानक स्वच्छ राहावे याकरिता प्रयत्न करणार आहेत. दिनांक 3 ते 14 ऑक्टोबर या काळात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र, 1 तारखेपासूनच या मोहिमेला पुणे विभागात सुरुवात करण्यात आली आहे. सासवड आगारामध्ये सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेत, सासवड नगरपालिकेने येथील आगार व्यवस्थापक सागर गाडे यांना प्रशस्तिपत्र देऊन कौतुक केले, तर इंदापूर बस स्थानकातील कामकाजाबाबत इंदापूर नगर परिषदेकडून कौतुक करण्यात आले.
तसेच, पुण्यातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या शिवाजीनगर आगारातसुध्दा रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यासोबतच भोर स्थानकावरदेखील या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्व स्थानकांसह पुणे विभागातील उर्वरित आगारांमध्येसुध्दा ही मोहीम राबविली जाणार आहे, असे एसटी अधिकार्यांनी सांगितले.
एसटीच्या पुणे विभागात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याद्वारे विभागातील सर्वच्या सर्व आगारांची साफसफाई करण्यात येत आहे. सातारा विभागातील कमिटी पुणे विभागातील स्वच्छ आगारांचे सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विभागातील आगारे स्वच्छ करून सुशोभित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
कैलास पाटील, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग