सासवड : जिल्हा नियोजन बैठकीत टॉवरच्या मुद्द्यावरून रणकंदन

सासवड : जिल्हा नियोजन बैठकीत टॉवरच्या मुद्द्यावरून रणकंदन

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील विधानभवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (दि. 19) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत दौंड, इंदापूर आणि बारामती या तालुक्यात सुरू असलेल्या विजेच्या मुद्द्यावरून रणकंदन पाहायला मिळाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यात पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. टॉवरच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदींनी चर्चेत भाग घेतला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वप्रथम यावर भाष्य करताच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला. तीन तासदेखील वीज शेतकर्‍यांना मिळत नाही, हे सांगताना आ. भरणे यांनी महावितरण व महापारेषणच्या अधिकार्‍यांनी उत्तरे द्यावीत, असा आग्रह धरला. यावर महावितरणच्या अधिकार्‍यांनी पुरंदर तालुक्यातील साकुर्डे, पिसर्वे, भोसलेवाडी, जेजुरी अशा गावात शेतकर्‍यांनी विरोध केल्याने विजेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले.

या टॉवरलाईनवर जवळपास सात तालुक्यांतील विजेचा प्रश्न अवलंबून असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमच्या तालुक्यावर असा अन्याय का असा प्रश्न विचारत टॉवरसाठी नक्की विरोध कुणाचा आहे? विजय शिवतारे यांचा आहे का? संजय जगताप यांचा आहे का? असे प्रश्न अधिकार्‍यांना केले. पोलिस बंदोबस्त लावून काम करावे, अशी मागणी अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

पोलिस बंदोबस्तात काम करण्याची मागणी अजित पवार यांनी करताच या विषयात माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले, पिसर्वे, साकुर्डे, जेजुरी, कोथळे, भोसलेवाडी अशा अनेक गावात टॉवरची कामे सुरू आहेत. पुरंदर तालुक्यात गावोगावी टॉवर उभारून शेतकर्‍यांच्या जमिनींची महापारेषण विभागाने वाट लावली आहे. दिवे गावातील एका महिला शेतकर्‍याची केवळ 38 गुंठे जागा आहे. या जागेच्या मधोमध टॉवर केल्याने तिच्या जमिनीला कवडीचाही भाव आज कुणी देत नाही.

महापारेषण शेतकर्‍यांना समाधानकारक पैसे देत नसल्याने मी अनेक वर्षे त्यांना विरोध करून कामे बंद पाडली. काही शेतकर्‍यांच्या समस्या अत्यंत साध्या आहेत. डोंगराळ किंवा वन जमिनीला लागून टॉवर केल्यास शेतकर्‍यांच्या जमिनी घ्यायची गरज लागणार नाही. परंतु, शेतकर्‍यांचे नुकसान करूनच टॉवर उभारायचा अट्टाहास महापारेषणचा असेल तर कितीही पोलिस लावले तरी मी शेतकर्‍यांच्या बाजूने असेन, असे शिवतारे या वेळी म्हणाले. त्यावर पालकमंत्र्यांनी 27 तारखेला विशेष बैठक लावून हा प्रश्न मिटवण्याचा निर्णय जाहीर केला आणि बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news