रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणाच्या अधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे माती उपसा बंद करावा लागला, याचा राग मनात धरून तक्रार करणारा आणि माती विक्रेता यांच्यात खानवटे (ता. दौंड) येथे तुफान मारामारी झाली. याप्रकरणी दौंड पोलिसात परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानवटे गावाच्या हद्दीत असणार्या उजनी संपादित क्षेत्रातून काळी माती उचलून ती शेतात टाकण्यासाठी राजेगाव परिसरातून माती वाहतूक केली जात आहे, अशी तक्रार विलास जाधव याने उजनी लाभक्षेत्रातील अधिकार्यांकडे केली. त्यामुळे उजनी धरण प्रशासनाचे अधिकारी गावात आले आणि माती उपसा बंद झाला. त्याचाच मनात राग धरून काही ट्रॅक्टर मालक-चालक आणि माती विक्रेता शंभु राजेभोसले हे तक्रार करणारे विलास जाधव याच्या घरासमोरील रस्त्यावर आले.
त्यांनी विलास जाधव याला बाहेर बोलावले. घरासमोरील गर्दी पाहून जाधव याच्या घरातील महिलादेखील बाहेर आल्या. या वेळी चर्चा सुरू असताना शंभु राजेभोसले याने महिलांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावर एका महिलेने घरातील मिरची पावडर आणून जमलेल्या जमावाच्या दिशेने फेकली. मिरची पावडर टाकल्याने चिडलेले सर्व ट्रॅक्टर मालक-चालक, माती विक्रेता आणि तक्रार करणारे जाधव यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली. दरम्यान, मिरची पावडर जमावाच्या दिशेने फेकल्यामुळे जमाव शांत होऊन गर्दी कमी झाली. तेवढ्यात थोड्या वेळाने शंभु राजेभोसले हा मोटारीतून (एमएच 42 एएस 5636) आला आणि तलवार घेऊन विलास जाधव याच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात विलास जाधव आणि त्याच्या नातेवाइकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने तेथून पळ काढला. त्याची मोटार तेथेच राहिली. विलास जाधव व त्याच्या नातेवाइकांनी दगड मारून त्याची मोटार फोडली.
याप्रकरणी दौंड पोलिसात ताराबाई तुकाराम जाधव यांनी शंभु राजेभोसले यांच्या विरोधात फिर्याद दिली असून शंभु राजेभोसले यानेही तक्रार दाखल केली. त्यानुसार कुणाल विलास जाधव, विलास तुकाराम जाधव, राजेंद्र तुकाराम जाधव, विवेक राजेंद्र जाधव, अश्विनी राजेंद्र जाधव, शारदा दत्तात्रय जाधव, रूपा विलास जाधव (सर्व रा. खानवटे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
हेही वाचा