

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : पोस्ट खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत ऑनलाइन व्यवहारास शहरवासीयांची पसंती मिळत आहे. शहरात अशा खातेदारांची संख्या दोन लाखांवर आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत राबविण्यात येणारी आधार पेमेंट सिस्टीम ज्येष्ठांसाठी उपयुक्त ठरत आहे.
ज्येष्ठांनी मागणी केल्यानंतर दहा हजार रुपयांपर्यंतचे कोणत्याही बँकेतील अथवा पोस्टातील पैसे पोस्टमनमार्फत घरपोच दिले जातात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही; मात्र त्या व्यक्तीचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
लॉकडाउन काळात दोनशेहून अधिक ज्येष्ठांना अडीच लाख रुपयांपर्यंतचे वाटप करण्यात आले. लॉकडाउननंतरही या सेवेस प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीने टपाल सेवेने कात टाकली आहे. पोस्टाने ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन सुविधा सुरू केल्या आहेत. सन 2016 पासून ऑनलाईन व्यवहारांसाठी पोस्टाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू केली.
मोबाईलवर इंडिया पोस्ट पेमेंट बँक डाऊनलोड केल्यावर त्यात आपली माहिती भरावी लागते. माहिती भरल्यानंतर ग्राहकाचे खाते त्याच्याशी जोडले जाते.
हे अकाउंट कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये काऊंटरवर व कोणत्याही पोस्टमनकडे उघडता येते. त्यासाठी आधारकार्ड नंबर आणि अंगठ्याचा ठसा आवश्यक असतो.
या अकाउंटमध्ये शासनाच्या सर्व योजनांचे पैसे जमा होतात. हे अकाउंट पेटीएम, गुगल पे, भीम अॅप प्रमाणे काम करते. पैसे ट्रान्सफर करणे, रिकरिंग डिपॉझिट अकाऊंटचे पैसे भरणे, सुकन्या, पीपीएफ खात्याचे पैसे ऑनलाईन भरणे ही कामे या खात्यामार्फत केली जातात. त्यामुळे पोस्टात जाण्याचा त्रास वाचतो.
ऑनलाइन वीजबिल, कर विमाहप्ता, डिश अँटिना रिचार्ज करणे, इंडिया पोस्ट बँकेच्या माध्यमातून खातेदाराला शक्य झाले आहे. खातेदारांनी केलेल्या व्यवहारांचे स्टेटमेंट मिळते.
शहरवासीयांचा या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे पोस्ट खात्याच्या वतीने सांगण्यात आले. शहरात पोस्टाची तीस कार्यालये असून. सव्वा चारशे कर्मचारी काम करतात.
ज्येष्ठांनी मागणी केल्यास त्यांचे खाते असलेल्या कोणत्याही बँकेतील किंवा पोस्टातील अकाउंटवरचे पैसे त्यांना घरपोच केले जातात. त्यासाठी मागणी नोंदवावी लागते.
पोस्टमनच्या माध्यमातून आधार अनेबल पेमेंट सिस्टिमद्वारे ज्येष्ठ नागरिकांना त्यांची पेन्शन व इतर स्वरूपाच्या विड्रॉल पोस्टमन मार्फतच घरपोच केले जातात.
पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना केंद्र शासनाकडून पंतप्रधान मातृ वंदना योजनेअंतर्गत पाच हजार रुपये अनुदान देण्यात येते. इंडियन पोस्ट बँक पेमेंट बँकेमार्फत या महिलांचे डिजिटल खाते उघडण्यात येत आहे. त्यांचे पैसे ही खात्यात जमा होतात.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते काढण्यासाठी आधार कार्ड व पॅन कार्ड ही कागदपत्रे सादर करून अन् शंभर रुपये भरून कोणीही व्यक्ती खाते उघडू शकते. हे खाते उघडल्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत दिल्या जात असलेल्या सुविधांचा ग्राहकांना लाभ घेता येतो.
आधार पेमेंट सिस्टीममुळे ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे लॉकडाऊन काळात या सेवेचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला. लॉकडाऊन काळात दोनशे ज्येष्ठांना अडीच लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. आजही या योजनेचा लाभ घेणार्यांचे प्रमाण वाढत आहे. लाभार्थीचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
-के. एस. पारखी,जनसंपर्क अधिकारी पोस्ट
https://youtu.be/5JsVWLXDOHU