आकुर्डी : कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मन:स्ताप

आकुर्डी : कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मन:स्ताप
Published on
Updated on
आकुर्डी (पिंपरी ): महापालिकेच्या हेडगेवार भवन येथील करसंकलन केंद्रात एकच खिडकी सुरू असल्यामुळे कर जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. तसेच, प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत असल्याचे दिसून आले.
महापालिका प्रशासनाने 30 जूनपर्यंत मिळकतकर भरल्यास यामध्ये सूट देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे कर भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. 30) हेडगेवार भवन येथील करसंकलन केंद्रात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यातच एकच खिडकी सुरू असल्याने आणि त्यातही संथगतीने काम सुरू असल्याने नागरिकांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले.
खिडकीवर जुनाच जीआर चिटकवलेला 
खिडकीवर जुनाच अध्यादेश (जीआर) 2017 -18 चा चिटकवलेला होता, त्यामुळे तेथे आलेल्या नागरिकांना हवी ती माहिती मिळत नव्हती. नवीन अध्यादेशाबद्दल विचारणा केली असता, आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी ज्येष्ठांना सांगितले. यामुळे महापालिकेचा गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले.
एकच खिडकी सुरू
कर भरण्यासाठी हेडगेवार भवन येथे परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, एकच खिडकी सुरू असल्याने कर भरण्यास वेळ लागत होता. कर भरण्याचे कामही संथगतीने सुरू होते. त्यामुळे नागरिकांनी आणखी एक खिडकी सुरू करण्याची विनंती केली.
ज्येष्ठांना बसण्यासाठी  एकच बाकडा 
अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळपासून कर भरण्यासाठी रांगेत थांबले होते. ज्येष्ठांना दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत होते. गर्दी असूनही केवळ एकच बाकडा बसण्यासाठी ठेवला होता. त्यामुळे काहींना उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच, पाणी पिण्यासाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी कुलरचीही दुरवस्था झाल्याचे पाहून पाणी न पिणेच पसंत केले.
स्वच्छतागृहाची नाही सोय
अनेक ज्येष्ठ नागरिक कर भरण्यासाठी सकाळपासून हेडगेवार भवन येथे आले होते. येथे स्वच्छतागृहाची सोय नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. कोणत्याही प्रकारच्या माहिती संदर्भातील बोर्ड तेथे लावलेले नसल्याने त्यांना नीट माहिती मिळत नव्हती. कार्यालयातील कर्मचारी दुपारी न सांगता जेवणासाठी निघून गेले. जेवणासंदर्भातील वेळापत्रकही लावलेले दिसत नव्हते. कार्यालय किती वाजता बंद वा उघडते यासंदर्भातील बोर्डही लावला नव्हता.
ऑनलाइन कर भरता येत नसल्यामुळे येथे येण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन तास थांबूनही नंबर आला; मात्र जेवणाची वेळ झाली असे सांगून कर्मचारी निघून गेले. संथगतीने काम सुरू आहे. बसायलाही जागा नाही.
                                                                                  – अरुण बोर्‍हाडे, नागरिक, प्राधिकरण आकुर्डी, 
शौचालयाची सोय नाही. पिण्याच्या पाणीजवळ अस्वच्छता पसरली आहे. सकाळपासून थांबून आहे. बसण्यासाठी जागा नाही. जेवणाच्या वेळेसंबंधीचे वेळापत्रक लावलेले नाही. जुनाच जीआर खिडकीवर चिकटवलेला असल्याने माहिती मिळाली नाही. कार्यालयीन शिस्त नाही. येथे येऊन मनस्ताप झाला. 
                                                                                   – विजय सायकर, नागरिक निगडी 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news