जुनी सांगवीत चिखलमय रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

जुनी सांगवीत चिखलमय रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : जुनी सांगवी येथील हिरकणी सोसायटी, शिंदेनगर या परिसरात महापालिकेच्या 'ह' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ड्रेनेज विभाग व स्थापत्य विभागामार्फत येथील परिसरात रस्ते खोदकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे; मात्र विकासकामे करीत असताना संबंधित अधिकारी मात्र येथील परिसरातील नागरिकांच्या
सुरक्षेची कोणतीही काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे.

जुनी सांगवी येथील हिरकणी सोसायटी, शिंदेनगर या परिसरात ऐन सणासुदीच्या काळात येथील रस्त्याचे घाईघाईने खोदकाम करून ड्रेनेजलाईन टाकण्यात आली होती. सण असल्याने रस्ता सुरळीत करून देण्यात आला; मात्र दिवाळीत रस्त्याच्या कडेला, रस्त्यावर पडलेल्या राडारोड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.
या वेळी येथील परिसरातील नागरिकांनी त्वरित महापालिकेच्या 'ह' क्षेत्रीय कार्यालयात जाऊन रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकारी यांना तक्रार करून निवेदन दिले.

संबंधित अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेत येथील रस्त्याचे पुन्हा खोदकाम सुरू केले. मात्र नुकत्याच दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला. परिसरातून जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडणेही कठीण झाले आहे; मात्र संबंधित अधिकारीदेखील परिसरातील नागरिकांची होत असलेली त्रेधातिरपीट पाहून याकडे डोळेझाक करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

परिसरातील रस्ता चिखलमय झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची, चाकरमानी, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चिखलमय परिसरामुळे गेले काही दिवसांपासून डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
महिनाभराचा कालावधी लोटूनही येथील कामाला गती देण्यात आलेली नाही. पालिकेने विकासकामे जरूर करावीत. ती हिताचीच आहेत. मात्र या कामामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याचीदेखील खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत येथील नागिरक व्यक्त करत आहेत. येथील रस्त्याच्या कामास गती देऊन त्वरित कामकाज पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

तीन दिवसांपूर्वी पाऊस झाला. त्यामुळे या परिसरातील रस्त्यावर चिखल होऊन निसरडा झाला आहे. मात्र कामे सुरू आहेत. येथील रस्त्याचे काम एक महिनाभरात पूर्ण होऊन रस्ता सुरळीत होईल. नागरिकांनीदेखील सहकार्य करावे.

– सुनील दांगडे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग

गेले महिनाभर सण सूददेखील व्यवस्थित साजरा करता आला नाही. वाहने चालवताना, पायी चालताना नागरिकांना येथील रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. सर्वत्र खडी वाळू पसरून धुळीचे साम्राज्य होत आहे.

     – कुंदन कसबे, स्थानिक नागरिक

पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्यावरून तरुणांना चालणे कठीण होत आहे. ज्येष्ठांना तर बाहेरच पडता येत नाही. खड्डे बुजविण्यात येतात. मात्र चढउतार होत असल्याने वाहन घसरून अपघात घडून येत आहेत.
 – उमा शिनगारे, स्थानिक नागरिक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news