पुणे शहरात पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव; महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा फटका

पुणे शहरात पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव; महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा फटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील वारजे, कोथरूड, औंध, सहकारनगर, कात्रज व नगर रस्त्याच्या काही भागांत गुरुवारी (दि.6) पाणी येणार नाही, याची माहिती महापालिका प्रशासनाने दिलीच नाही. मात्र पाणीपुरवठा बंद ठेवला. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांना ऐन सणाच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी धावाधाव करावी लागली.

वारजे तसेच पर्वती जलकेंद्रात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. महापालिकेने या प्रकाराबाबत महावितरणकडे तक्रार केल्याने महावितरणने गुरुवारी काम करण्याची तयारी दर्शविली. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने लगेचच गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारी (दि.2) ही माहिती जाहीर करताना पाणीपुरवठा विभागाकडून अर्धवटच माहिती जाहीर करण्यात आली.

दुसर्‍या दिवशी महापालिकेच्या ही बाब लक्षात आली. मात्र, त्यानंतर लगेच बुधवारी (दि.5) प्रसार माध्यमांना दसर्‍याची सुटी असल्याने ही माहिती नागरिकांपर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी पाणी न आल्याने नागरिकांनी महापालिकेकडे तसेच माजी नगरसेवकांकडे विचारणा केली.

या गोंधळाची माहिती कोणालाच नसल्याने अनेक नागरिकांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले. प्रामुख्याने सहकारनगर, महर्षीनगर, पद्मावती, बिबवेवाडी, औंध, नगर रस्ता, शिवाजीनगर परिसर, खडकी, औंध या भागातील नागरिकांना हा अघोषित 'पाणी बंद'चा फटका बसला.

जवळपास अर्ध्या शहरात पाणी बंद राहणार असल्याने महापालिकेने नागरिकांना आधीच कल्पना देणे आवश्यक होते. मात्र, पाणीपुरवठा विभाग आणि जनसंपर्क विभागात समन्वय नसल्याने नागरिकांना माहिती मिळाली नाही. परिणामी दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली असून, याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी.

                                          – नितीन कदम, अध्यक्ष, राष्ट्रवादी अर्बन सेल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news