

कोरेगाव पार्क: कार्यालयीन वेळेत अधिकार्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या विभागात अथवा कार्यालयात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांना दिवसभर ताटकळत ठेवून ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी (दि.2) एका हॉटेलमध्ये पार्टी झोडत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे या विभागात सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधिकारी आणि कर्मचारी किती वेळ उपस्थित होते, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.कार्यालयीन वेळेत अधिकार्याच्या या निष्काळजीपणाबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. (Latest Pune News)
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी अधिकार्यांना भेटून आपल्या समस्या आणि प्रश्न मार्गी लागतील, या अपेक्षेने नागरिक ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात येत होते. मात्र, अभियंता विभागात अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात नसल्याने नागरिकांना ताटकळत बसावे लागले.
या काळात ठेकेदार अधिकारी आणि कर्मचार्यांना घेऊन घोले रोडवरील एका हॉटेलामध्ये पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यासह सुमारे पंचवीस जण पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीचे बिल एका ठेकेदाराने आदा केले. या पार्टीच्या व्हिडिओची मंगळवारी कार्यालयात चर्चा सुरू होती.
याबाबत सहायक आयुक्त सदानंद शिंपी यांना विचारले असता त्यांनीही पार्टीबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच उपअभियंता अशोक झुळूक यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित एक समस्या सोडविण्यासाठी मी सोमवारी अभियंता विभागात गेलो. मात्र, सकाळी अकरापासून बारा वाजेपर्यंत या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी भेटले नाहीत. त्यामुळे मी वरिष्ठाकडे तक्रार करण्यासाठी गेलो. मात्र, ते देखील उपस्थित नव्हते.
- जॉन्सन कोल्हापुरे, नागरिक
अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेत जागेवर उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत भेटत नसतील तर नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रार करावी.
- माधव जगताप, उपायुक्त, महापालिका