

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव परिसरात मंगळवारी (दि.25) रात्रीपासून ते बुधवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिकांना मंगळवारची रात्र जागून काढवी लागली. केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले. लोहगाव भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास खंडित झाला. त्यानंतर रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता.
बुधवारीदेखील दिवसभर वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. सध्या उन्हाळ्यामुळे उकाडा वाढला आहे. त्यातच विजेच्या लपंडावामुळे पंखा, कूलर, एसी बंद असल्याने नागरिक हैराण झाले. यामुळे महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकारी अभियंता अशोक जाधव म्हणाले, की लोहगावला वीजपुरवठा करणार्या फिडरमध्ये बिघाड झाल्याने या भागासाठी इतर सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा जोडून दिला जातो. त्याप्रमाणे खराडी सबस्टेशनमधून पुरवठा जोडून दिला आहे. मात्र, त्याठिकाणीदेखील लोड अधिक झाल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असून, तो सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.